Fungal Infection in Monsoon : पावसाळा हा आनंददायी असतो पण त्यासोबतच पावसाळा अनेक समस्या घेऊन येतो.पावसाळा आला की सर्वत्र जिवाणू झपाट्याने वाढू लागतात.बॅक्टेरिया पाण्यामध्ये आणि आर्द्रतेमध्ये वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे बुरशीजन्य संसर्ग.या ऋतूत पावसाच्या पाण्यासोबत तुमचा संपर्क दुषित पाण्यासोबत देखील येतो. त्यामुळे पायाला खाज सुटणे आणि फोड येणे, जखम होणे सुरु होते. यासाठी औषधोपचार तर गरजेचा आहेच मात्र योग्य काळजी घेतली तर अशा फंगल इन्फेक्शनपासून वाचता येते. यासाठी कोणत्या गोष्टींची बेसिक काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग कसा टाळावा
योग्य फुटवेअर निवडा
पावसाळ्यात योग्य फुटवेअर निवडणे सर्वात महत्त्वाचे असते. या वातावरणात रबर किंवा प्लास्टिकचे फुटवेअर घालणे चांगले. बंद कापडी शूज किंवा चप्पल घालणे टाळा कारण ते पाणी शोषून घेतात ज्यामुळे पायांमध्ये ओलावा जमा होतो आणि बुरशीजन्य संसर्ग होतो.
नखे लहान ठेवा
पावसाळ्याच्या दिवसात पायाची नखे वाढवणे टाळा. या दिवसात नखात माती आणि रस्त्यावरील दूषित पाणी जाऊन जखम होवू शकते. यासाठी नखे बारीक ठेवा. तसेच पावसात भिजून गेल्यावर नखे स्वच्छ पुसून घ्या.
त्वचेची काळजी घ्या
या दिवसात पावसात भिजल्याने त्वचा नेहमी ओलसर होते. कपडे शरीराला जादा वेळ चिटकून राहिल्यामुळे शरीरात खूपवेळ ओलावा राहतो. परिणामी फंगल इन्फेक्शन वाढते.
मिठाच्या पाण्यात पाय धुवा
पावसाळ्यात तुमचे पाय दिवसभर पावसाच्या पाण्यात भिजत असतील तर बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी तुमचे पाय मिठाच्या पाण्यात बुडवा. यासाठी एका टबमध्ये पाणी भरून त्यात दोन चमचे मीठ टाका. सुमारे 20 मिनिटे या पाण्यात पाय ठेवा. नंतर साध्या पाण्याने पाय धुवा. असे केल्याने पावसात संसर्गाचा धोका टाळता येतो.
या गोष्टींचीही विशेष काळजी घ्या
पावसाळ्यात केवळ पायांचीच नाही तर पायांसोबतच संपूर्ण शरीराचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच सकाळी अंघोळ केल्यावर ओल्या अंगावर कपडे घालू नका.अंग व्यवस्थित कोरडे करून कपडे घाला. या ऋतूत पावसाने ओले झालेले कपडे जास्त वेळ घालणे टाळा. याचबरोबर शक्यतो कपडे गरम पाण्याने धुवा. कारण यामुळे कपड्यांमध्ये पावसामुळे निर्माण होणारी बुरशी दूर होते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.