ऊन, पावसातच उरकावा लागतोय अंत्यसंस्कार; स्मशानशेडला निधी देण्याबाबत शासन, प्रशासन उदासिन; अनेक वाड्यावस्त्यांही स्मशानशेडपासून वंचित; 10 गावांत स्मशानशेडसाठी मिळेना जागा; खासगी मालकीची जागा देण्याबाबत उदासिनता
कृष्णात चौगले कोल्हापूर
जिह्यातील तब्बल 127 गावांतील अंत्यसंस्कार शेती, शिवारासह रस्त्याकडेलाच केले जात आहेत. ऊन, वारा, पाऊस याचा सामना करत पार्थिवास अग्नी देण्याची वेळ स्थानिक ग्रामस्थांवर आली आहे. यापैकी 117 गावांत स्मशानभूमी उभारण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध असली तरी शासन आणि प्रशासनाकडून पुरेशा निधीची तरतूद केली जात नसल्यामुळे तेथे स्मशानशेड उभारली गेली नाहीत. तर शासकीय जागेअभावी जिह्यातील 10 गावांमध्ये अद्याप स्मशानशेड नाहीत. खासगी जमीन मालकांचीही जागा देण्याबाबत नकारात्मक भूमिका असल्यामुळे निधी उपलब्ध असूनही या गावांमध्ये स्मशानशेड बांधता आलेले नाही. परिणामी काट्याकुट्यातून, चिखल-मातीतून वाट काढत ग्रामस्थांना शेतात किंवा रस्त्याकडेलाच अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे या गावांमध्ये स्मशानशेड कधी होणार असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेकडून स्मशानशेड, निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्मशानशेडकडे जाणारा रस्ता, दिवाबत्तीची सोय आदींसाठी 10 लाख रूपयांचा निधी दिला जातो. यासाठी ग्रामपंचायतीला किमान एक ते दोन गुंठे शासकीय जागा उपलब्धता करावी लागते. स्मशानशेड नसणारी ही संख्या केवळ 127 गावांपुरती मर्यादीत नसून प्रशासनाकडे नोंद नसलेल्या अनेक वाड्यावस्त्याही स्मशानशेडपासून वंचित आहेत.
जागा नाही, स्मशानशेड नाही
आजरा तालुक्यातील चिमणे, चंदगडमधील बसर्गे, करवीरमधील आंबेवाडी, पन्हाळ्यातील बोंगेवाडी, वेखंडवाडी, कोदवडे, पणोरे, राधानगरी तालुक्यातील फराळे, केळोशी बु., शिरोळमधील संभाजीपूर व घालवाड या एकूण 10 गावांमध्ये जागेअभावी स्मशानशेड उभारलेले नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थ आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्येच अंत्यसंस्कार करत आहेत. पण ज्यांची जमीन नाही, अशा कुटूंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या कुटूंबियांना अंत्यसंस्कारासाठी रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे शक्य असले तरी पावसाळ्यामध्ये सरणावरील सरपण भिजल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. दरम्यान आपल्या जागेमध्ये स्मशानशेड बांधण्याबाबत ग्रामस्थांची नकारात्मक भूमिका असल्यामुळे खासगी जागाही उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच स्मशानशेडला जागा दिल्यास त्या क्षेत्रामधील उर्वरित जागेचे बाजारमूल्य कमी होईल अशी भितीही ग्रामस्थांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे स्मशानशेडला ‘कोणी जागा देता का जागा ?’ असे म्हणण्याची ग्रामपंचायतींवर वेळ आली आहे. परिणामी ग्रामस्थांनीच पुढे येऊन जागा उपलब्ध करण्याची गरज आहे.
जागा आहे, पण निधीची प्रतिक्षा
जिह्यातील 117 गावांमध्ये जागा उपलब्ध असली तरी निधी अभावी त्या गावांमध्ये स्मशानशेडची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. यामध्ये आजरा तालुक्यातील जाधेवाडी, लाटगाव, मलिग्रे, हारपवडे, भुदरगड तालुक्यातील आंतुर्ली, तांब्याचीवाडी, पाळ्याचाहुडा, फये, म्हासरंग, शिवडाव, तांबाळे, देऊळवाडी, चंदगडमधील करंजगाव, धुमडेवाडी, हल्लारवाडी, देवरवाडी, महिपाळगड, बसर्गे, आसगोळी, बोंजुर्डी, कोरज, गणूचीवाडी, कानडी, कानूर खूर्द, कुरणी,सातवणे, शिरगाव, जांबरे, उमगांव, कोनेवाडी, इनाम कोळिंद्रे, कोदाळी, कोळिंद्रे खालसा, कलीवडे, मोटणवाडी, लाकूरवाडी, मांडेदूर्ग, कामेवाडी, दिंडलकोप, कागणी, सरोळी, शिनोळी खुर्द , कार्वे, सुंडी गडहिंग्लज तालुक्यातील बिद्रेवाडी, चिंचेवाडी, दुगुनवाडी, हासुरसासगिरी,हासुरवाडी, हुनगिनहाळ, जांभूळवाडी, कुमरी, कुंबळहाळ, काळमवाडी, शिप्पूर आजरा, सावतवाडी-नेसरी, तेगीनहाळ, यमेहट्टी, तावरेवाडी, तारेवाडी, मा.त.सावंतवाडी, गगनबावडा तालुक्यात तळये बु. कडवे, कोदे खुर्द, पन्हाळा तालुक्यात बोरीवडे, मोरेवाडी, तेलवे, नावली, पोर्ले तर्फ बोरगाव, वाळवेकरवाडी, जाफळे, दुर्गेवाडी, अमृतनगर, बोरीवडे, शहापूर, पोहाळे तर्फ बोरगाव, राधानगरी तालुक्यात बरगेवाडी, चाफोडी तर्फ आरळे, दुर्गमानवाड, केळोशी खुर्द, रामनवाडी, सावर्डे पा., क.तारळे, म्हासुर्ली, शाहूवाडी तालुक्यातील अमेणी, आंबार्डे, ऐनवाडी, बुरंबाळ, चांदोली, गिरगांव, गावडी, गेळवडे, घुंगूर, कातळेवाडी, कासार्डे, मरळे, मानोली, माळापुडे, मांजरे, उदगिरी, उखळू, वालूर, वरेवाडी, हातकणंगले तालुक्यातील जंगमवाडी, दुर्गेवाडी, कासारवाडी, मौजे तासगांव, शिरोळमधील राजापूरवाडी, जैनापूर या जिह्यातील 117 गावांत स्मशानशेडसाठी जागा उपलब्ध असली तरी निधीची प्रतिक्षा आहे.
अनेक स्मशानशेड ‘मरणासन्न’ अवस्थेत
जिह्यातील 1025 गावांपैकी ज्या गावांत स्मशानशेड आहे, त्यापैकी अनेक गावांतील स्मशानशेड सध्या मरणासन्न अवस्थेत आहेत. वादळी वाऱ्यामध्ये बहुतांशी स्मशानशेडवरील छप्पर उडून गेले असून काही ठिकाणी भिंती कोसळल्या आहेत. तर अनेक ठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पाणी, रस्ते, वीज आदी मुलभूत सुविधांची तर मोठी वाणवा आहे. अशा स्मशानशेडला सुस्थितीत आणायचे झाल्यास त्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्याने निधीची तरतूद करणे अपेक्षित आहे.









