असा कुठला केला होता गुन्हा?
जगात अनेक लोकांना मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचे अंत्यसंस्कारही प्राप्त होत नाहीत. असेच काहीसे एका इसमासोबत घडले आहे. या इसमावर 128 वर्षांनी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. चालू आठवड्याच्या अखेरीस त्याला दफन करण्यात येणार आहे. तसेच त्याची खरी ओळख जाहीर केली जाणार आहे. या इसमाच्या मृतदेहाला 19 व्या शतकात अजाणतेपणी ममीकृत करण्यात आले होते. ममीकृत करणे म्हणजे मृतदेह संरक्षित करणे असते. या मृत इसमाला ‘स्टोनमन विली’ नाव देण्यात आले होते. याची खरी ओळख अद्याप कुणासमोरच उघड करण्यात आलेली नाही.
संबंधित इसम मद्यपी होता इतकेच सांगण्यात आले आहे. त्याचा मृत्यू 19 नोव्हेंबर 1895 मध्ये किडनी निकामी झाल्याने झाला होता. मृत्युवेळी स्टोनमन विली हा चोरीप्रकरणी बर्क्स काउंटी तुरुंगात कैद होता. त्याला अटक करण्यात आल्यावर जेम्स पेन नाव ठेवण्यात आले होते. स्वत:चा मृत्यू समीप आल्याची जाणीव झाल्यावर स्टोनमनने तुरुंगाच्या डॉक्टरला आपले खरे नाव जेम्स पेन नसल्याचे सांगितले होते. तसेच स्वत:ची बहिण आणि भावाची बदनामी टाळण्यासाठी एक खोटे नाव नोंदविल्याची कबुली दिली होती. मृत्यूच्या अनेक आठवड्यांनंतरही त्याच्या खऱ्या ओळखीचे पुरावे मिळाले नव्हते.
त्याचे खरे नाव माहित नसल्याने अधिकाऱ्यांना मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सोपविता आला नव्हता. त्याचा मृतदेह रीडिंगसाठी पेनसिल्वेनियामध्ये ऑमन्स फनरल होमला सोपविण्यात आले होते. त्यावेळी तेथे मृतदेह संरक्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लेप तंत्रज्ञानावर प्रयोग केला जात होता. त्यामुळे हा मृतदेह चुकून ममीकृत करण्यात आला होता. परंतु एका शतकानंतरही स्टोनमनचा मृतदेह ऑमन्स फनरल होममध्ये डिस्प्लेसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचे दात अन् केस अद्याप अस्तित्वात आहे.









