प्रतिनिधी / सातारा :
स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वीडन या देशात भौतिक शास्त्रज्ञ या पदावर काम करणारे सातारा तालुक्यातील कुस बुद्रुकचे अजय भानुदास लोटेकर (वय 31) यांचे स्वीडन येथे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव तब्बल सव्वा महिन्यानंतर त्यांच्या मूळ गावी शनिवारी दाखल झाले. पार्थिव गावात दाखल होताच त्यांचे मित्र परिवार, कुटुंबियांना अश्रूंचा बांध फुटला. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सातारा तालुक्यातून जनसागर लोटला होता.
कुस बुद्रुक येथील अजय लोटेकर हे लहानपणापासूनच चाणाक्ष बुद्धीने सुपरिचित होते. नेहेमीच्या चौकटीमध्ये जगणे त्यांना माहिती नव्हते. आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग कुटुंबासाठी नाहीतर देशासाठी करायचा. या विचाराने त्यांनी मुंबईतील रूपारेल कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयात बीएस्सी शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमएस्सी तर इंडियन इन्स्टिटयूट जिओमॅग्नेटिक्स येथून पीएचडी मिळवत त्यांनी गगनभरारी घेत स्वीडन गाठले. सध्या स्वीडीश इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस फिजिक्स याठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून ते काम करित होते. त्यांनी आत्तापर्यंत पंधरा संशोधनात्मक पेपर प्रसिद्ध केले असून. ते प्लाझ्मावर सुपर सॉलीटरी व्हेव्हज आणि रेग्युलर सॉलीटरी व्हेव्हज यांचा परिणाम या विषयावर काम करत होते.
27 एप्रिलला लोटेकर यांचे अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. त्यांच्या कुटुंबांचा तर आधारच हरपला होता. शनिवारी गावात त्यांचे पार्थिव आले. गावातील ग्रामस्थांनी सजवलेल्या ट्रक्टरमधून गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, माजी उपसभापती अरविंद जाधव यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात कुसच्या स्मशानभूमीत भडाग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी निता असा परिवार आहे.