हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय मानवंदना : विविध संघ-संस्था पदाधिकाऱ्यांकडून श्रद्धांजली
वार्ताहर /कडोली
‘अमर रहे, अमर रहे तुकाराम पाटील अमर रहे’ च्या जयघोषात कडोलीचे सुपुत्र तुकाराम शिवाजी पाटील या लष्करी जवानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी त्याचे हृदयविकाराने निधन झाले होते. जवान तुकाराम शिवाजी पाटील यांचे पार्थिव सकाळी 9 वा. येथील श्री जोतिबा मंदिराजवळ आल्यानंतर फुलांच्या माळांनी सजविलेल्या ट्रॅक्टर टॉलीवर ठेवल्यानंतर तेथून अंत्ययात्रेला सुरूवात करण्यात आली. मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणण्यात आला. अंत्ययात्रेत शाळकरी मुले, विविध संघ, संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, हजारो ग्रामस्थ, महिला सहभागी झाल्या होत्या.
अंत्ययात्रा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आल्यानंतर पार्थिव काही वेळासाठी या ठिकाणी ठेवण्यात आला. यावेळी गावातील विविध संघ संस्था पदाधिकारी, कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सचिव मलगौडा पाटील, तहसीलदार बसवराज नागराळ, ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष दीपा मरगाळे, माजी ग्रा. पं. अध्यक्ष अण्णू कटांबले, उदय सिद्दण्णावर आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बेळगाव लाईफ इन्फंट्री रेजिमेंटचे सुभेदार संतोष नलवडे आणि सहकार्यांच्यावतीने तुकाराम पाटील यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी कडोली येथील माजी सैनिक संघनेच्यावतीने बाबू बाळेकुंद्री यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी तुकाराम यांचे आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण, मुली आदींना श्रद्धांजली वाहिण्यासाठी बोलविण्यात आले.
वडिलोपार्जित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
यावेळी तुकाराम पाटील यांच्या पार्थिवावर पूर्वांपार चालत आलेल्या वडिलोपार्जित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंची उपस्थिती होती. अनेकांतून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.