कोल्हापूर ; कोल्हापूर शहर विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील दलित वस्त्यांमधील विकास कामांचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. दलित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे राहणीमान सुधारावे, त्यांना मुलभूत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून, शहरातील अंधारात असलेल्या दलित वस्त्या आता प्रकाशमय होणार आहेत.
यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून रु.दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शहरातील सुमारे १५ दलित वस्त्यांमध्ये सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट यांच्याकडे रु.दोन कोटी निधी देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२५ – २६ या वर्षासाठी रु.दोन कोटी निधीची मंजुरी देण्यात आली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, दलित वस्त्यांमध्ये राहणा-या सामान्य नागरिकांना मिळणा-या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. या नागरिकांचे जगणे बदलून त्यांच्याही वाट्याला चांगले आयुष्य यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षात या वस्त्यांमधील विकासकामांसाठी निधी देवून जीवनमान सुधारण्यास प्राधान्य दिले जात आहे.
आजही शहरातील अनेक वस्त्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याचे चित्र दिसत होते. याकरिता या ठिकाणी सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील दलित वस्त्या प्रकाशमय होणार असल्याची माहितीही या पत्रकात आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
या ठिकाणी बसणार सोलर हायमास्ट लॅम्प…
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर कसबा बावडा, मातंग वसाहत कसबा बावडा, रमणमळा, कनाननगर, सदर बाजार, विचारेमाळ, इंदिरानगर झोपडपट्टी शिवाजी पार्क, सिद्धार्थनगर, सोमवार पेठ, सिद्धार्थ गल्ली लक्ष्मीपुरी, वारे वसाहत, गंजीमाळ, यादवनगर, मातंग वसाहत राजारामपुरी, टाकाळा खण माळी कॉलनी या परिसरात हे सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यात येणार आहेत.








