आमदारांच्या हस्ते भूमीपूजन, कामाला लवकरच सुरवात : सहा-सात महिन्यात उर्वरित रस्त्यांच्या समस्याही सुटणार
खानापूर : तालुक्यासह ग्रामीण भागात दळणवळण सुलभ व्हावे यासाठी सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा करून तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी मंजूर करून आणण्यासाठी गेल्या दोन वर्षापास्tन आमदार विठ्ठल हलगेकर सतत प्रयत्नशील आहेत. सध्या विविध रस्त्यांच्या विकासासाठी 50-54 वित्त आयोगाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांच्या रस्त्यांच्या विकासासाठी 17 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यातून तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांच्या समस्या मार्गी लागणार आहेत. येत्या सहा-सात महिन्यात उर्वरित रस्त्यांच्या समस्याही सुटणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाची योग्य सोय होणार आहे. असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या भूमीपूजनप्रसंगी व्यक्त केले. राज्या शासनाच्या 50-54 वित्त आयोगाच्या माध्यमातून तालुक्यातील 17 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
यातून बैलूर संपर्क रस्त्याच्या विकासासाठी 4 कोटी अनुदान मंजूर झाले असून, जांबोटी-खानापूर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 6 कोटी, जांबोटी वाडा येथील संपर्क रस्त्यासाठी 60 लाख, अल्लोळी, कान्सुली संपर्क रस्त्याच्या विकासासठी 2 कोटी 50 लाख, नागुर्डा ते काटगाळी संपर्क रस्त्यासाठी 60 लाख तसेच गंगवाळी संपर्क रस्त्यासाठी 45 लाख, जटगा, हलसाल रस्त्यासाठी 1 कोटी 50 लाख, बोगूर संपर्क रस्त्यासाठी 1.50 लाख रु. तर इटगी गावातील सीसी रस्ते व इतर कामासाठी 25 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व रस्त्यांचे भूमीपूजन आमदारांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या सर्व रस्त्यांच्या कामाची सुरवात येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. यावेळी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष बसवराज हादीमणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी अध्यक्ष संजय कुबल, मल्लाप्पा मारिहाळ, भाजपा नेते सदानंद पाटील, सुनील मड्डीमणी, श्रीकांत इटगी, दामोदर नाकाडी, लक्ष्मण झांजरे, स्थानिक ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









