विधान परिषदेत गदारोळ : सत्ताधारी, विरोधकांत आरोप-प्रत्यारोप
बेळगाव : अनुसूचित जाती, जमातींसाठी (एससी-एसटी) राखून ठेवण्यात आलेल्या विशेष निधीतून 11 हजार कोटी रुपये राज्य सरकारने गॅरंटी योजनांसाठी वळविल्याच्या कारणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठा वादंग झाला. यावरून दोनवेळा सभागृह स्थगित झाले. विरोधकांनी रोखठोक भूमिका घेत सभापतींच्या आसनासमोर येऊन काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केल्याने सभापतींना सभागृह स्थगित करणे भाग पडले. विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तर काळात चलवादी टी. नारायणस्वामी यांनी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी एससीएसपी/टीएसपी योजनेंतर्गत राखीव ठेवलेल्या निधीतून गॅरंटी योजनांसाठी किती निधी घेण्यात आला? असा प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांकडून यावर स्पष्टीकरण मागितले होते. दरम्यान समाज कल्याण मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी माहिती देताना 11 हजार कोटी निधी वळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते कोटाश्रीनिवास पुजारी यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी यावर आवाज उठविला. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असलेला निधी गॅरंटी योजनांसाठी का घेण्यात आला? सदर निधी त्वरित जमा करण्यात यावा, यावर स्पष्टीकरण देण्यात यावे, असे सांगत सभागृहात जोरदार आवाज उठविला.
यावरुन सत्ताधारी गटातील सदस्यांनीही भाजप सरकारच्या कार्यकाळात 10 हजार कोटी निधी इतर कामांसाठी वळविण्यात आला आहे. त्यावेळी मागासवर्गीयांचे कल्याण दिसले नाही का? असा प्रतिप्रश्न करुन विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी जोरदार आवाज उठवत सभापतींच्या आसनासमोर आंदोलन सुरू केले. काँग्रेस सरकार दलित विरोधी आहे, काँग्रेस सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांत शब्दीक चकमक उडाली. सभापती बसवराज होरट्टी यांनी सदस्यांना वारंवार सांगून आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे सभागृह स्थगित करुन विश्रांती घेण्यात आली. सकाळी स्थगित झालेले सभागृह एक तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाले. दरम्यान विरोधी सदस्यांनी आपली भूमिका लावून धरली. त्यामुळे आणखीनच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान तेजस्वीनी गौड, तिप्पेस्वामी, भोजेगौड, शांताराम यांनी विरोधकांची बाजू मांडली. तर काही सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर आंदोलन सुरूच ठेवले होते. यावेळी मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजपच्या कार्यकाळात मागासवर्गीयांच्या दहा हजार कोटी निधींवर डल्ला मारला आहे, असा आरोप केला. यामुळे हा वाद आणखी अधिक चिघळला. शेवटी दोन्ही पक्षाकडून वादवादी होत असल्याचे पाहून सभापती बसवराज होरट्टी यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. व या विषयावर सोमवारी विशेष वेळ देण्यात येईल, असे सांगून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. सभापतींच्या विनंतीवरुन विरोधी पक्षाने आंदोलन मागे घेतले.









