ऑक्टोबरपासून पैसे जमा नाही : लाभार्थ्यांमध्ये संताप, गृहलक्ष्मी विस्कळीत
बेळगाव : पाच गॅरंटी योजनेतील अन्नभाग्य योजनेचा निधी ऑक्टोबर महिन्यापासून ठप्प झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची घालमेल सुरू आहे. सुरुवातीच्या काळात अगदी गाजावाजा करून योजना सुरळीत सुरू करण्यात आली. मात्र, आता योजना विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे. काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये गृहलक्ष्मी, शक्ती, अन्नभाग्य, विद्यानिधी, गृहज्योती आदींचा समावेश आहे. मात्र, सद्यस्थितीत गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनेचा निधी रखडला आहे. त्यामुळे या योजनांबाबत आता सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. शिवाय या योजना बंद पडणार की काय? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि मंत्र्यांकडून पंच गॅरंटी योजना कधीही बंद पडणार नाहीत. सुरळीत सुरू राहतील, अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या खात्यावर मागील दोन-तीन महिन्यांपासून निधी जमा झालेला नाही. त्यामुळे पंच गॅरंटी योजनेचे आता काय समजावे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
योजनेबाबत लाभार्थ्यांतून नाराजी
अन्नभाग्य योजनेंतर्गत 10 किलो तांदळाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, मुबलक तांदूळ नसल्याने तांदळाऐवजी प्रतिव्यक्ती 170 रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. सुरुवातीचे काही महिने ही योजना सुरळीत चालवून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे घालण्यात आले. मात्र, अलीकडच्या काही महिन्यात योजना पूर्णपणे ढेपाळली आहे. त्यामुळे गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनेबाबत लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.









