कोल्हापूर/ बाळासाहेब उबाळे
शहरातील धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. श्वसन आणि फुफ्फुसाचे विकार होत आहेत. धुळीचे प्रमाण कमी करणे, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून गतवर्षी 7 डिसेंबरला 8 कोटींचा निधी आला. यातून काही कामे प्रस्तावित केली. पण नऊ महिन्यात केवळ कागदोपत्रीच काम सुरु आहे. महापालिकेतील संबंधित अधिकारी त्याच्या फाईली घेऊन मंजुरीसाठी वरिष्ठांकडे फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता कधी आणि कशी सुधारणार असा प्रश्न आहे.
रस्त्यावर रोज हजारो वाहनांतून निघणारा धुर, धुलीकणामुळे हवेचे प्रदुषण वाढत आहे. या पार्श्वभुमीवर प्रदुषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या पर्यावरण विभागाला 8 कोटी निधी मिळाला. पण प्रस्तावित कामे कागदावरच आहेत.
काम अंतिम टप्प्यात
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत कामांचे नियोजन केले आहे. प्रस्ताव तयार केले असून मंजुरीचे काम शिल्लक आहे.
समीर व्यांघ्राबर, -पर्यावरण अधिकारी, महापालिका
तीन चार्जिंग स्टेशनसह पाच इलेक्ट्रिक बस खरेदी
हवा प्रदुषण नियंत्रणासाठी पाच इलेक्ट्रिक बस खरेदीचा प्रस्ताव आहे. 6 कोटी 25 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. राज्याकडून थेट खरेदी किंवा जीसीसी पध्दतीने याबाबत मार्गदर्शन मागवले आहे.
इलेक्ट्रिक दाहिनी
सध्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर होतो आहे. स्मशानभूमीत इलेक्ट्रिक दाहिनी बसवण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 25 लाखाची तरतूद केली आहे. शहर अभियंत्यांकडून हे काम प्रस्तावित होणार आहे.
मिस्ट टाईपचे कारंजे
शहरात धुळीमुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यासाठी शहरातील गर्दींच्या ठिकाणी मिस्ट टाईपचे कारंजे प्रस्तावित आहे. यासाठी शहर अभियंता कार्यालयाकडून 65 लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. निविदा मंजुरीसाठी प्रशासकांकडे फाईल पाठवली आहे.
आयुक्त नसल्यामुळे परिणाम
सध्या महापालिकेला कोणी वाली नाही, अशी स्थिती आहे. अडीच वषें महापालिकेचे सभागृह नाही. तीन महिने झाले आयुक्तसुध्दा नाहीत. यामुळे महत्वाच्या कामासंबंधीचे निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत.पण आज आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे या प्रश्नांवर तोडगा निघेल अशी आशा आहे.









