हुतात्मा मेजर अक्षय गिरीश यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणार ध्वजस्तंभ : 29 नोव्हेंबर 2016 मध्ये आले होते वीरमरण
प्रतिनिधी /बेळगाव
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे मराठा लाईट इन्फंट्रीच्या पुढाकाराने हुतात्मा मेजर अक्षय गिरीश यांच्या स्मरणार्थ 100 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. या ध्वजस्तंभासाठी लोकमान्य सोसायटीने 75 हजार रुपयांचा निधी दिला आहे. बेळगाव येथे शुक्रवारी सकाळी लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, एसकेई सोसायटीचे ज्ञानेश कलघटगी, जीएसएस कॉलेजचे प्राचार्य बी. एल. मजुकर, सरिता पाटील व विनायक जाधव आदी उपस्थित होते.
मेजर अक्षय हे निवृत्त विंग कमांडर गिरीशकुमार आणि मेघना यांचे सुपूत्र आहेत. अक्षय यांनी बालपणीच लष्करात सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले. बेंगळूर येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, त्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे त्यांनी शिक्षण घेतले. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीतून सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून 10 डिसेंबर 2007 रोजी बंगाल सॅपर्स 51 इंजिनिअर्स येथे रुजू झाले.
नागालँड येथे सेवा बजावताना त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पेलली. काश्मीर आणि सिक्कीमसारख्या प्रतिकूल सीमाप्रदेशात कुंपण घालण्याचे काम आणि बंकर्स बांधण्याचे काम पूर्ण केले. यंग ऑफिसर्स कोर्स आणि ज्युनिअर कमांडर्स कोर्समध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत इंस्ट्रक्टर्स ग्रेडींग मिळविले. रस्ते अपघातात जखमी झालेल्या 11 काश्मिरी नागरिकांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याबद्दल 2010 चा आर्मी कमेंडेशनचा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
29 नोव्हेंबर 2016 मध्ये पहाटेच्या सुमारास शेजारच्या आर्टीलरी युनिटवर दहशतवादी हल्ला झाला व चार सैनिक हुतात्मा झाले. युनिटच्या क्विक रिऍक्शन टीमचे नेतृत्व अक्षय यांच्याकडे होते. लोकवस्तीच्या इमारतीत दबा धरून दहशतवादी बसले होते. अक्षय यांनी आपल्या टीमसह पुढे येऊन तेथे कुटुंबाचे रक्षण केले. याच चकमकीत दहशतवाद्यांनी अक्षय यांच्यावर ग्रेनेड फेकला. यात ते गंभीर जखमी होऊन दुसऱया दिवशी ते हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ किश्तवाड येथे 100 फूट उंचीचा ध्वजस्तंभ बांधण्यात येणार आहे. यासाठी लोकमान्यने निधी दिला आहे.
अंशुमन पाटील यांचा सत्कार
याच दरम्यान सध्या काश्मीरमध्ये सेवा बजाविणारे व जीएसएस कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले अंशुमन पाटील यांचा कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला. अंशुमन यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मेजर अक्षय यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱया ध्वजस्तंभासाठी निधी दिल्याबद्दल लोकमान्य सोसायटीला व किरण ठाकुर यांना धन्यवाद दिले.









