आमदार विठ्ठल हलगेकर यांची माहिती
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्यमहामार्गाच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या रस्ते विकास राखीव निधी (सीआर फंड) अंतर्गत सहा कोटीचा निधी मंजूर झाला असून, लवकरच या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यानी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत-जाबोटी राज्य महामार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. आंतरराज्य वाहतुकीच्यादृष्टीने हा रस्ता खानापूर तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता म्हणून गणला जातो. या रस्त्यावरून गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात माल व प्रवासी वाहतूक चालते.
मात्र या रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची गेल्या दोन-तीन वर्षापासून पार दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची रुंदी केवळ 3.5 मीटर आहे. तसेच हा रस्ता घाट वळणाचा असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला निर्बंध असतानाही पावसाळ्dयात या रस्त्यावरून बेळगाव-गोवा अशा अवजड वाहतुकीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू राहिल्याने या रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने सद्यस्थितीमध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरला आहे.
दुरुस्ती कामाची निविदा मंजूर
रस्ता दुरुस्तीची निविदाही मंजूर झाली आहे. या अंतर्गत जांबोटी-खानापूर या संपूर्ण 18 किलोमीटर रस्त्याचे पुनर्डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी दिली. रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्यामुळे जांबोटी भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तरुण भारत वृत्ताची दखल
सदर रस्ता वाहतुकीसाठी निरोपयोगी ठरल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. तसेच रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात तरुण भारतमधून देखील वेळोवेळी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शासन दरबारी प्रयत्न करून केंद्र सरकारच्या सी. आर. फंड अंतर्गत 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.









