आमदार विठ्ठल हलगेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
खानापूर : लालवाडी-चापगाव व कोडचवाड या राज्य मार्गाची पार दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन या रस्त्याच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून बांधकाम खात्याच्या विशेष अनुदानातून पहिल्या टप्प्यात शिवोली, चापगाव ते वड्डेबैलपर्यंत तीन किलोमीटर रस्त्याच्या विकास कामासाठी 1 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पत्रकारांची बोलताना दिली.
नागरगाळी-कटकोळ या राज्य मार्गामध्ये लालवाडीपासून चापगाव, कोडचवाड, अवरोळी या रस्त्याचा समावेश होतो. यापैकी पहिल्या टप्प्यात अवरोळीपासून चिक्कदिनकोपपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात वड्डेबैलपासून चापगाव ते शिवोलीपर्यंत तीन किलोमीटर त्यासाठी या 1 कोटी 70 लाखाच्या निधीतून रस्त्याचा विकास केला जाणार आहे. त्यानंतर शिवोलीपासून लालवाडी पर्यंतच्या रस्त्याचे काम दुसऱ्या टप्प्यात हाती घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
बांधकाम खात्याअंतर्गत खानापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये वरील कामाबरोबर बैलूर ते बैलूर क्रॉस या 5 किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी, बोगूर क्रॉस 1 किलोमीटर रस्त्यासाठी दीड कोटीचा निधी, तर तोपिनकट्टी गावातील रस्त्यासाठी 70 लाखाचा निधी मंजूर केला असून या कामांचा येत्या आठवड्याभरात प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता संजय गस्ता यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते.









