आजच्या मोर्चात उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा समाजाला मागील अधिवेशनामध्ये 50 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला होता. मात्र मराठा समाजातील एका व्यक्तीलाही 50 रुपयेही मदत झाली नाही. यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्यासाठी मंगळवारी मोर्चा असून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजातील सर्व तरुणांनी तसेच महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाजाची मते घेण्यासाठी हा निधी जाहीर करण्यात आला. मात्र कोणत्याच सरकारने आतापर्यंत या समाजाला निधी दिला नाही. मराठा समाजातील तरुणांना, महिलांना तसेच इतरांना आर्थिक मदत करतो, असे सांगून ऑनलाईन अर्जदेखील घेतले आहेत. मात्र पुढील प्रक्रियाच पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला असून सर्वांनी एकजुटीने आवाज उठविण्याची गरज आहे.
मराठा समाजाला निधी मंजूर झाल्यानंतर त्याविरोधात काही कन्नड दुराभिमान्यांनी गरळ ओकली होती. त्यानंतरही निधी देतो असे आश्वासन दिले होते. इतर समाजांना मराठा समाजानंतर निधी जाहीर करण्यात आला आणि त्यांना निधीही देण्यात आला. मात्र मराठा समाजाला निधी दिला गेला नाही.
उपस्थितीसाठी आवाहन
सरकारने तातडीने निधी दिला नाही तर येत्या निवडणुकीत हिसका दाखविणे काळाची गरज आहे. मागील अधिवेशनात मराठा समाजाला मोठा निधी जाहीर केला गेल्याने या समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र दोन वर्षे उलटली तरी एक रुपयाही निधी दिला गेला नाही. हा मोठा अन्याय आहे. त्यामुळे मंगळवारच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आवाज उठविणे गरजेचे आहे. तेव्हा मराठा समाजातील सर्वांनीच उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









