युवकांचा शिवारात धुडगूस : कचऱ्याची समस्या
बेळगाव : थर्टीफस्टनिमित्त आयोजित केलेल्या ओल्या पार्ट्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. युवकांनी उभ्या पिकांत धुडगूस घातल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 31 डिसेंबरला पार्टी करणाऱ्या ‘तळीरामांची मजा अन् शेतकऱ्यांना सजा’ असे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. विशेषत: शहरापासून जवळ असलेल्या शिवारामध्ये मद्य ढोसून युवकांनी धांगडधिंगाणा घातला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईकडून पार्ट्यांना महत्त्व दिले जाते. विशेषत: मध्यरात्री या पार्ट्यांना पेव चढतो. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी बाटल्या, पत्रावळ्या पिशव्या आणि प्लास्टिक ग्लास शिवारातच फेकून दिल्या आहेत. त्यामुळे शिवारात कचऱ्याची समस्या निर्माण होऊन बाटल्यांपासून इजा पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषत: रब्बी हंगामात जोंधळा, हरभरा, वाटाणा, मसूर आदी कडधान्याची पेरणी करण्यात आली आहे. या पिकांमध्येच युवकांनी पार्ट्या करून धुडगूस घातला आहे. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले. शिवाय बाटल्या, प्लास्टिक व इतर वस्तूंची विल्हेवाट लावण्याऐवजी जागेवर टाकून देण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे. विशेषत: शहराजवळील शहापूर, अलारवाड, बसवण कुडची, शिंदोळी क्रॉस, मंडोळी, आंबेवाडी, कंग्राळी, अलतगा, काकती, होनगा, कणबर्गी आदी ठिकाणी रस्त्याला लागून असलेल्या शिवारात ही कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकांनी बाटल्या फोडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शिवारात फिरणेही धोक्याचे बनले आहे. अशा धुडगूस घालणाऱ्या युवकांना आवर कोण घालणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.









