परकीय आक्रमकांनी बदललेली ऐतिहासिक स्थळांची मूळ नावे देण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्याने याविषयावर आता पडदा पडायला हरकत नसावी. ‘देशाच्या इतिहासातील गोष्टी वर्तमानावर आणि भावी पिढय़ांवर थोपविता येणार नाहीत. देश इतिहासात अडकवून ठेवता कामा नये,’ ही यासंदर्भातील निकाल देताना न्यायालयाने केलेली टिप्पणीदेखील महत्त्वपूर्ण. कोणत्याही राष्ट्राच्या व तेथील नागरिकांच्या दृष्टीने इतिहासाला अनन्यसाधारण स्थान आहे. कारण त्यातून वर्तमान व भावी पिढय़ांना प्रेरणा व स्फूर्ती मिळते, तशीच त्या-त्या काळातील परिस्थिती, राहिलेल्या त्रुटी, याचेही आकलन होते. म्हणूनच कोणत्याही देशाचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक ठरते. जेणेकरून त्यातून बोध घेऊन पुढची वाटचाल अधिक निर्विघ्न होऊ शकेल. तथापि, इतिहासात केवळ रमून चालेल काय? तर कदापि नाही. खरे तर इतिहास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आजचे वर्तमान हाही उद्याचा इतिहासच असणार आहे. भले तो आपल्याला आवडो वा नावडो. न्यायालय नेमकी याच वस्तुस्थितीची जाणीव करून देते. भारतावर अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमणे केली, राज्य केले. हे सत्यही आपण नाकारू शकत नाही. मुळात या घटना व घडामोडींचीही इतिहासात नोंद झाली आहे. आता हा सगळा भूतकाळ उकरून देशातील वातावरण तापविणे योग्य नाही. आम्हाला असे मुद्दे जिवंत करून देशाच्या सौहार्दाला धक्का बसवायचा नाही, असे न्यायालय म्हणते. ही भूमिका भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राशी सुसंगत अशीच ठरावी. इतिहास हा बहुपेडी असतो. वेगवेगळय़ा रंगांच्या धाग्यांनी इतिहास विणला जातो. हे धागे परस्परांमध्ये अशा तऱहेने गुरफटलेले असतात, की एकापासून दुसऱयाला विलग करावे म्हटले, तरी करता येत नाही. त्यामुळे इतिहासातील निवडक भाग आपण हटवू शकत नाही, ही न्यायालयाची स्पष्टोक्ती लक्षात घेतली पाहिजे. अलीकडेच केंद्राने औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव करण्यास मंजुरी दिली आहे. या दोन शहरांची नावे बदलण्यास मान्यता दिल्याने भविष्यात आणखी काही शहरांची नावे बदलण्याच्या हालचाली सुरू होऊ शकतात. तशी आता अहमदनगर वा आणखी काही शहरांची नावेही बदलण्याची मागणी होताना दिसते. गुजरातची राजधानी अहमदाबादचे नावही कर्णावती करण्याचा विचार सुरू आहे. अशा किती शहरांची नावे बदलणार आणि त्यातून काय साधणार, हाच मूळ प्रश्न होय. मुळात नावे बदलून कोणत्याही शहराच्या, तेथील नागरिकांच्या जगण्यात काही फरक पडेल काय? तसा तो पडणार असता, तर नक्कीच त्याला काही अर्थ प्राप्त झाला असता. उदाहरण औरंगाबादचेच घ्या. येथील पाण्याचा व खड्डय़ांचा प्रश्न मिटता मिटत नाही. म्हणूनच लोकांचे दैनंदिन प्रश्न जैसे थे ठेऊन शहरांची नावे बदलण्याचा सपाटा हा केवळ मतांचा खेळ ठरतो. देशातील वेगवेगळय़ा नगरांना शहराचे, शहरांना महानगरांचे स्वरुप प्राप्त होत आहे. नागरीकरण व विकासाच्या या झपाटय़ात शहरांपुढे अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य, प्रदूषण, विजेचा प्रश्न, वाहतुकीची कोंडी, रस्त्यांचा प्रश्न, कचरा समस्या अशा कितीतरी समस्यांनी शहरे ग्रासली आहेत. शहरांची ही कोंडी फोडण्यासाठी सर्वपक्षीयांनी प्रयत्न करायला हवेत. त्याऐवजी नावासारख्या अस्मितेच्या मुद्दय़ांनाच आपण प्राधान्य देणार असू, तर जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्षच होणार. म्हणूनच याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. भारतीय राज्य घटनेने धर्मनिरपेक्ष हा शब्द स्वीकारला आहे. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे. आज सेक्युलॅरिझम वा धर्मनिरपेक्षता या तत्त्वांची काही मंडळींकडून खिल्ली उडविली जात असली, तरी भारतीयत्वाचाच हा गाभा आहे. न्यायालय म्हणते, त्याप्रमाणे हिंदू धर्म हा एक जीवनमार्ग असून, त्याने सर्वांना सामावून घेतले आहे. त्यात कट्टरतेला कोणताही थारा नाही. हे मूलभूत तत्त्व समजून न घेता इतिहासात अडकण्याच्या वा लोकांना अडकविण्याच्या या सापळय़ापासून सर्वांनी सावध राहणे आवश्यक ठरते. न्या. के एम. जोसेफ यांनी वैयक्तिक अंगाने यासंदर्भात केलेले विवेचनही अत्यंत विचारगर्भ म्हणता येईल. मी ख्रिश्चन असलो, तरी मला हिंदू धर्म आवडतो. मी त्याचा अभ्यास करण्याचाही प्रयत्न करतो. हिंदू हा एक महान धर्म आहे. तुम्हीही त्याची महानता लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न करू नका, असे ते म्हणतात. स्वामी विवेकानंद यांचे शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतील भाषण जगप्रसिद्ध आहे. बंधू-भगिनींनो, अशी सुरुवात करीत जग जिंकणाऱया स्वामीजींनी हिंदू धर्म, त्यातील उदारभावाची जगाला जाणीव करून दिली. या उदारमतवादी परंपरेला संकुचिततेचे नख लावले जाऊ नये. अशाच आशयाची अपेक्षा न्यायमूर्ती महोदय व्यक्त करतात. ती अतिशय रास्तच म्हणावी लागेल. आजचे युग हे आधुनिक आहे. ही आधुनिकता केवळ राहणीमान, जीवनशैली, विकास यात दिसू नये. तर विचारांमध्येही त्याचे प्रतिबिंब पडले पाहिजे. एखाद्या विशिष्ट समुदायाला रानटी ठरवून भागणार नाही. तर इतिहासातील दाखले उगाळत न बसता हातात हात घालून सर्वांना पुढे जावे लागेल. केवळ स्थळांची नावे बदलल्याने संदर्भ पुसता येत नसतात. याची जाणीव ठेवायला हवी. ‘पुराणातली वांगी पुराणातच’ अशी मराठीत एक म्हण आहे. पुराणातील अनेक गोष्टींचा वास्तवाशी संबंध नसतो. त्या अनाकलनीय वा अवैज्ञानिक असतात, असा त्याचा अन्वयार्थ. इतिहासाबाबतही असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. मुख्यतः अजेंडा ठेऊन इतिहासाचे उत्खनन केले जात असेल, तर त्यातून आजवर जपलेला बंधूभावच धोक्यात येण्याची शक्यता अधिक. म्हणून त्यातील रमणूक माणूस म्हणून मागे नेणारीच ठरते.
Previous Articleदहशतवादी सरफराजला इंदोरमध्ये अटक
Next Article ‘महावितरण’कडून कराडकर वेठीस
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








