सप्टेंबरमध्ये पक्षाध्यक्षाची निवडणूक लढविणार नाही
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पक्षाध्यक्षाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या (एलडीपी) अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नसल्याचे किशिदा यांनी बुधवारी जाहीर केले आहे. जपानमध्ये सत्तारुढ पक्षाचा अध्यक्षच पंतप्रधानपदी निवडला जातो. याचमुळे किशिदा यांच्या या घोषणेनंतर देशाला नवा पंतप्रधान मिळणार हे निश्चित झाले आहे.
नवा नेता निवडला गेल्यावर सर्व लोक एकजूट होतील आणि एक उत्तम टीम तयार करतील अशी अपेक्षा असल्याचे किशिदा यांनी म्हटले आहे. किशिदा 2021 मध्ये लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये समाप्त होणार आहे. जपानमध्ये पंतप्रधान किशिदा यांच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली आहे. याचे कारण त्यांच्या पक्षावर झालेले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत.
जुलै महिन्यात किशिदा यांचे अप्रूव्हल रेटिंग 20 टक्क्यांपेक्षा कमी झाले होते. सलग आठव्या महिन्यात किशिदा यांचे रेटिंग इतके कमी राहिले होते. 2021 मध्ये पंतप्रधान किशिदा यांचे रेटिंग 65 टक्क्यांच्या आसपास होते.
शिंजो आबे यांच्या मृत्यूनंतर किशिदा यांच्या रेटिंगमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली. आबे यांच्या मृत्यूनंतर युनिफिकेशन चर्चसोबतच्या एलडीपीच्या संबंधांचा खुलासा झाला होता. हे चर्च पक्षाला आर्थिक बळ पुरविते. यानंतर याच्याशी निगडित अनेक घोटाळे उघडकीस आले.
एप्रिल महिन्यात स्थानिक निवडणुकांमध्ये एलडीपीचा मोठा पराभव झाला होता. यानंतर जुलै महिन्यात टोकियो महापालिका पोटनिवडणुकीतही पक्षाचा दारुण पराभव झाला. याचमुळे एलडीपीचे बहुतांश खासदार पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नव्या चेहऱ्याची निवड करण्यासाठी आग्रही आहेत.
भ्रष्टाचाराचे आरोप
किशिदा यांच्या पक्षाच्या खासदारांवर पक्षाला मिळालेल्या राजकीय देणगीची रक्कम हडप करण्याचा आरोप आहे. पक्षाचा निधी स्वत:च्या खात्यात वर्ग करण्याचे कृत्य या खासदारांनी केले होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यावर पंतप्रधान किशिदा यांनी अनेक मंत्री आणि अन्य लोकांना पदावरून हटविले होते.
पुढील पंतप्रधान कोण?
जपानमध्sय लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत आहे. अशास्थितीत पक्षाचा नवा अध्यक्षच जपानचा पुढील पंतप्रधान हेणार आहे. एलडीपीचे अनेक वरिष्ठ नेते पक्ष अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यात पक्ष महासचिव तोशिमित्सु मोटेगी, डिजिटल मंत्री तारो कोनो, आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची आणि विदेशमंत्री योको कामिकावा यांचे नाव सामील आहे.









