पावसामुळे दिलेल्या सुट्यांची होणार भरपाई
बेळगाव : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना तीन ते चार दिवस सुटी देण्यात आली होती. या सुटीची भरपाई म्हणून आता शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरविल्या जाणार असल्याचा आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. पुढील चार शनिवार आता पूर्णवेळ शाळा भरणार आहे. मुसळधार पावसामुळे 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील शाळांना सुट्या देण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. तर काही ठिकाणी पाणी आल्यामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुटीची भरपाई पुढे केली जाईल, असे सांगितले होते. 30 ऑगस्ट, 6, 13 आणि 20 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस शाळा भरविल्या जाणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 4.45 यावेळेत शाळा भरविल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळांना पत्र पाठवून पूर्णवेळ शाळा भरविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी आजपासून होणार असल्याने पालकांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









