काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, सर्वांना विश्वासात घेऊन पुढे गेले पाहिजे, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी सांगितले. ते बेंगळुरात पत्रकारांशी बोलत होते.
दहशतवादी हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी गुऊवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप व्यक्त करताना खर्गे म्हणाले की, देश महत्त्वाचा असून देशाचे संरक्षण करण्यासह कल्याणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील तिघांसह 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांनी यायला हवे होते. ते आले नाहीत हे योग्य नाही. देश महत्त्वाचा असून धर्म आणि भाषा नंतर येतात. म्हणून आपण सर्वांनी देशासाठी एकत्र लढले पाहिजे. आपण सरकारला पाठिंबा देऊ, असे मी अनेकवेळा सांगितले आहे. आम्ही पाठिंबा देऊ. तुम्ही त्याचा योग्य वापर करा. जर त्यांनी (केंद्राने) सर्वांना विश्वासात घेतले तर पुढील पावले सोपी होतील. परंतु एकमेकांवर टीका करणे योग्य ठरणार नाही, असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.









