पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुतोवाच : सर्वसहमती निर्माण करण्याचे स्वागत : चांद्रयान-3 साठी भारताचे अभिनंदन
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्समध्ये ग्लोबल साऊथच्या देशांना विशेष महत्त्व देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. जी-20 च्या अध्यक्षतेखाली भारतानेही या विषयाला महत्त्व दिले आहे. भारत ब्रिक्सच्या विस्ताराला पूर्ण पाठिंबा देतो, आम्ही यावर सहमतीने पुढे जाण्याचे स्वागत करतो, असे मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केले. यादरम्यान, ब्रिक्सच्या यशांची माहिती देताना या संघटनेने अनेक यश मिळवण्याबरोबरच सकारात्मक बदल घडवून लोकांचे जीवन सुधारल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.
ब्रिक्सला भविष्यकाळात भक्कम संघटना बनवण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. जवळपास दोन दशकांमध्ये ब्रिक्सने एक दीर्घ आणि गौरवशाली प्रवास केला अनेक यशांना गवसणी घातल्याचा दावाही 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या पूर्ण सत्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी केला. ब्रिक्सच्या पूर्ण सत्रात पंतप्रधान मोदींनी अवकाश संशोधन संघटना स्थापन करणे, शिक्षण आणि तंत्रज्ञानातील सहकार्य, कौशल्य मॅपिंगमध्ये सहकार्य वाढवणे, आंतरराष्ट्रीय बिग पॅट अलायन्स अंतर्गत सहकार्य आणि पारंपारिक औषधांसह काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले.
ब्रिक्सच्या विस्ताराबाबत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, अर्जेंटिना, अल्जेरिया, बोलिव्हिया, इंडोनेशिया, इजिप्त, इथिओपिया, क्मयुबा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, कोमोरोससह 40 हून अधिक देशांचा यात समावेश आहे. हे सर्व देश पारंपारिक पाश्चात्य देशांचे वर्चस्व असलेल्या जागतिक संस्थांना पर्याय म्हणून ब्रिक्सकडे पाहतात. ब्रिक्समध्ये सामील होऊन केवळ आर्थिक लाभच होणार नाही, तर पश्चिमेकडील श्रीमंत देशांच्या वर्चस्वाशी स्पर्धा करण्यासही मदत होईल, असा या देशांचा विश्वास आहे.

भारत-जोहान्सबर्ग ऋणानुबंध
जोहान्सबर्गसोबतच्या भारताच्या संबंधांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी जोहान्सबर्गसारख्या सुंदर शहरात पुन्हा एकदा येणे माझ्यासाठी आणि माझ्या शिष्टमंडळासाठी आनंदाची गोष्ट आहे. या शहराचा भारतीयांशी आणि भारतीय इतिहासाशी खोल आणि जुना संबंध आहे. येथून काही अंतरावर टॉलस्टॉय फार्म असून ते महात्मा गांधींनी बांधले होते. महात्मा गांधींनी भारत, युरेशिया आणि आफ्रिकेच्या महान विचारांची सांगड घालून आपल्या एकता आणि सौहार्दाचा भक्कम पाया घातला, असेही पंतप्रधान म्हणाले.
द. आफ्रिकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा
15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी द्विपक्षीय बैठक केली. जोहान्सबर्गमधील खुल्या आणि पूर्ण सत्राला उपस्थित राहण्यापूर्वी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ते एकत्र आले होते. ब्रिक्स देश संवाद, मध्यस्थी आणि वाटाघाटीद्वारे संघर्ष संपवण्यास समर्थन देत राहतील, अशी भूमीका यावेळी द्वयींनी मांडली. तसेच भारताच्या चांद्रयान मोहिमेबाबत रामाफोसा यांनी मोदींचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले. ब्रिक्स परिवार म्हणून आमच्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग असून आज या महान कामगिरीच्या आनंदात आम्ही तुमच्यासोबत असल्याचा आम्हाला आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सर्व देशांना चीनची साथ : जिनपिंग
शाश्वत विकास व औद्योगिक सहकार्यासाठी ब्रिक्स फ्रेमवर्क संयुक्तपणे स्थापन करण्यासाठी चीन सर्व देशांसोबत काम करेल, असे ब्रिक्सच्या पूर्ण अधिवेशनात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्पष्ट केले. शांतता राखण्यासाठी आपण राजकीय आणि सुरक्षा सहकार्य वाढवले पाहिजे असेही ते म्हणाले. शीतयुद्धाची मानसिकता अजूनही आपल्या जगाला सतावत असून भू-राजकीय परिस्थिती तणावपूर्ण होत आहे. ब्रिक्स देशांनी शांततापूर्ण विकासाच्या दिशेने पुढे जावे आणि ब्रिक्स धोरणात्मक भागिदारी मजबूत करावी. ब्रिक्स देशांनी खरा बहुपक्षवाद स्वीकारत एकता टिकवून ठेवली पाहिजे आणि विभाजनाला विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.









