सुधाकर काशीद,कोल्हापूर
जंगलात वन्य प्राणी किती याची दरवर्षी गणती होते. ही आकडेवारी थोडी कमी अधिक असते. वन्य प्राणी गणतीसाठी नव्या नव्या पद्धतीही आल्या आहेत.पण वन्य प्राण्यांच्या गणतीसाठी प्रत्यक्षात जंगलातील पाणवठ्याच्या जागी बांधलेल्या मचानावर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री बसून केल्या जाणाऱ्या व गणतीचे महत्त्व आजही कायम आहे. नुकतीच म्हणजे आठवड्यापूर्वी अशाच पद्धतीने कोल्हापूर सांगली जिह्यात वन्य प्राण्यांची गणना झाली आहे.आणि पौर्णिमेच्या रात्रीचा शितल चंद्रप्रकाश,जंगलातील पाणवठे आणि पाणवठ्यावर बांधलेली मचाने याचे महत्त्व आणखी अबाधित झाले आहे.
असे एका रात्रीत जंगलातील सर्व प्राणी मचानावर बसून कसे काय दिसू शकतील? हा या वन्यप्राणी गणती संदर्भात बहुतेक सर्वांच्या मनात येणारा पहिला प्रश्न आहे.पण खूप अनुभव आणि अभ्यासाने अशा पद्धतीने वन्यप्राणी गणना निश्चित केली गेली आहे.वन्य प्राण्यांना शिकार किंवा खाद्य त्या त्या परिस्थितीत मिळत असते. आणि दिवसातून एकदा दोनदा पाणी ही वन्यप्राण्यांची गरजच असते. त्यासाठी जंगलातील नैसर्गिक किंवा काही ठिकाणी कृत्रिम तयार केलेल्या पाणवठ्याच्या ठिकाणी वन्य प्राण्यांना एकदा तरी यावेच लागते.जंगलात कमी अधिक प्रमाणात बारमाही झरे वाहत असतात.झऱ्याच्या मार्गात ठिकठिकाणी डबकी साचलेली असतात.वन्यप्राणी या पाण्याचा अचूक वेध घेऊन आपली तहान भागवत असतात.वन्य प्राण्यांच्या नेमक्या या सवयीचा अभ्यास करून वनविभागामार्फत वर्षातून एकदा या पाणवठ्यावर मचान बांधून त्यावर प्रत्यक्ष कर्मचारी बसवून वन्यप्राण्यांची गणती केली जाते.उदाहरणार्थ दाजीपूरच्या जंगलात 20 -25 पेक्षा अधिक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे आहेत.तेथे वन्य प्राणी येऊन गेल्याचे येथील चिखल,धुळीत दिसणाऱ्या वन्यप्राण्यांच्या पायाच्या ठशावरून, विष्ठेवरून स्पष्टच होते.
अगदी सर्वच नाही.पण महत्त्वाचे पाणवठे वन्यप्राणी निरीक्षण करण्यासाठी निश्चित केले जातात. त्या पाणवठ्यालगतच्या उंच झाडावर मचान बांधले जाते.त्यावर तीन ते चार वन्य कर्मचाऱ्यांना,वन्यप्राणी अभ्यासकांना रात्रभर बसता येते.येथून पाणवठा व आसपासचा परिसर बऱ्यापैकी दिसू शकतो.प्राणी शक्यतो रात्री पाणवठ्यावर येतात.त्यामुळे वन्यप्राणी निरीक्षणासाठी रात्रीची वेळ आणि पौर्णिमेची रात्रच निवडली जाते.जेणेकरून चंद्राच्या शितल प्रकाशात पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्याचेअस्तित्व टिपता येते.
अशा पद्धतीने जंगलात ठिकठिकाणी बांधलेल्या मचानावर बसलेल्यांना त्या रात्री काय काय दिसले याची दुसऱ्या दिवशी एकत्रित नोंद घेतली जाते. ही नोंद अगदी अचूक होत नाही.पण तरीही जंगलातील वन्यप्राण्यांचा बऱ्यापैकी अंदाज घेता येतो.या वन्य प्राण्यांच्या निरीक्षणासाठी रात्रभर बसलेल्या वन कर्मचाऱ्यांना अभ्यासकांना आपसात बोलणे,मोबाईल किंवा रेडिओचा आवाज करणे,उग्र वासाच्या अत्तरांचा,रसायनांचा,तंबाखू, वीडी,सिगारेट,आगपेटी याचा वापर करण्यास मनाई असते. एवढेच काय मचानावर बसून फोटो काढण्यासही परवानगी नसते.त्यामुळे वर वर जंगलातील मचानावर बसण्यात सुरुवातीला खूप उत्सुकता असली तरीही रात्रभर हालचाल न करता आपसात न बोलता मचानावर बसून रहाणे ही कसोटीच असते.पण दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मचान बांधुन त्यावरून वन्यप्राण्यांचे थेट निरीक्षण ठरलेले असते.

पौर्णिमेची रात्र महत्वाची…
बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच एका वेळी ठिकठिकाणच्या मचानावर कर्मचारी बसल्यामुळे वन्यप्राणी विचलित होण्याची शक्यता असते. त्यासाठी काही दिवस अगोदरच मचान बांधून ठेवले जाते. जेणेकरून पाणवठ्याच्या परिसरात झालेल्या काही बदलांची वन्य प्राण्यांना सवय होऊ शकते. ते मचानाला बुजत नाहीत. केवळ वन्यप्राणी दिसलेच पाहिजेत असे नाही. तर, त्यांचा आवाज, सकाळी दिसणारे त्यांच्या पायाचे ठसे ,विष्ठा यावरूनही वन्यप्राण्यांच्या वावराचा अंदाज घेता येतो.
जंगलं आणि मचान…
जंगल आणि मचान यांचे एक नाते आहे.हे मचान रात्रभर वन कर्मचाऱ्यांना आधार देते.मचानाचे जंगल व्यवस्थापनातील हे महत्त्व ध्यानात घेऊन आम्ही यावर्षी चांगले मचान बांधण्यासाठी वन कर्मचारी मजूर यांच्यासाठी अंतर्गत स्पर्धाही घेतली.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आम्ही बांधलेल्या मचानावरून वेगवेगळ्या तीनशे पन्नास वन्य जीवांचे दर्शन झाले. अर्थात हा आकडा कमी जास्त होऊ शकतो. पण या मचान पद्धतीमुळे आम्हाला बऱ्यापैकी वन्यप्राण्यांचा,त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या पाणवठ्याच्या स्थितीचा अंदाज घेता येतो.
नानासाहेब लडकत,वनसंरक्षक









