वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये सीआयडी काउंटर इंटेलिजेन्सला मोठे यश मिळाले आहे. दीर्घकाळापासून फरार दहशतवादी मोहम्मद रफीक शेखला अटक करण्यात आली आहे. रफीक हा डोडा जिल्ह्यातील भद्रवाहच्या चक्रभाटीचा रहिवासी आहे. दहशतवादाप्रकरणी तो वाँटेड होता. अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर सीआयडी-सीआयजेच्या फ्यूजिटिव्ह ट्रॅकिंग टीमने मोठी मोहीम राबवत रफीकला जम्मू बसस्थानकावरून ताब्यात घेतले आहे. रफीकला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक कुख्यात ड्रग तस्कराला ताब्यात घेतले आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोफिक सब्स्टेंसेज अधिनियमाच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जम्मुच्या बिश्नाह येथील चिराग अत्रीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस अधिनियमाच्या अंतर्गत अनेक गुन्हे नोंद आहेत.









