वृत्तसंस्था/ लंडन
पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी फरार नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनमधील किंग्ज बेंच डिव्हिजन हायकोर्टाने सुनावणीनंतर फेटाळून लावला आहे. भारताच्या वतीने सीबीआयच्या वकिलांनी नीरवच्या युक्तिवादांना विरोध केला होता. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) कर्ज घेऊन सुमारे 14 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर नीरव मोदी जानेवारी 2018 मध्ये देश सोडून पळून गेला. नीरवला 19 मार्च 2019 रोजी नैर्त्रुत्य लंडनमधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तेथील तुरुंगात आहे. तथापि, कायदेशीर प्रक्रियांमुळे नीरवचे भारताकडे प्रत्यार्पण अद्याप शक्य झालेले नाही. नीरव मोदीविरुद्ध भारतात फसवणुकीशी संबंधित तीन गुन्हे दाखल असून त्याप्रकरणीही तो तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहे. मात्र, हिरे व्यापारी नीरव मोदीची भारतात प्रत्यार्पण होईपर्यंत जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे.









