माळमारुती पोलिसांची धाडसी कारवाई
बेळगाव : तब्बल 27 वर्षांपासून फरारी असलेल्या दरोडे प्रकरणातील एका आरोपीला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन वर्षे शिक्षाही ठोठावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. किशन हंकू जाधव (वय 57) रा. मुधोळ तांडा, जि. बिदर असे त्याचे नाव आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर मल्लिगवाड, शिवलिंग सारवाडे, शिवाजी चव्हाण आदींनी मुधोळ तांडा येथे त्याला अटक केली आहे. 1997 मध्ये माळमारुती पोलीस स्थानकात दाखल झालेल्या एका दरोडे प्रकरणात किशनला अटक झाली होती. 2007 मध्ये या प्रकरणातील आरोपींना शिक्षाही झाली आहे. मात्र, 27 वर्षांपासून किशन फरारी होता. न्यायालयीन कामकाजालाही हजर होत नव्हता. दरोडेखोरांच्या 14 जणांच्या टोळीतील किशन हा एक आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी बिदरजवळील मुधोळ तांडा गाठला. गुरुवारी त्याला येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. किशन ज्या परिसरात राहतो, त्या परिसरात कारवाईसाठी जाणाऱ्या पोलिसांवरच हल्ला केल्याची उदाहरणे आहेत. तरीही पोलिसांनी धाडसाने त्याला अटक करून बेळगावला आणले. पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी माळमारुती पोलिसांचे कौतुक केले आहे.









