सातारा,प्रतिनिधी
Satara Suicide News : पत्नी बरोबर झालेल्या किरकोळ वादातून नैराश आलेल्या एकाने सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या सारोळापुलावरुन नीरा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार घडलाय. बुधवारी आत्महत्येचा प्रकार समोर आल्यानंतर तब्बल दोन दिवस महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड सर्च अँण्ड रेस्क्यू टिम,महाबळेश्वर व शिरवळ रेस्क्यू टिमच्या मदतीने या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. अखेर काल या शोध मोहिमेला यश मिळाले आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.निलेश महादेव काकडे (वय- 40, मूळ रा.उगलेवाडी हजारमाची ता.कराड सध्या रा.जाधववाडी,पिंपरी चिंचवड,पुणे ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश याचा पत्नी बरोबर किरकोळ विषयावरून वाद झाला होता. त्यामुळे पत्नी आपल्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. याबाबतची पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिखलीमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तो मसवड येथील आपल्या मेव्हण्याकडे राहण्यासाठी जात असतानाच पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावर मध्यभागी दुचाकी लावली आणि त्य़ाने नदीत उडी घेतली. नातेवाईकांनी शोधा शोध करूनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर नातेवाईकांना सारोळा पुलावर पुणेहून साताऱ्याला जाणाऱ्या दिशेस दुचाकी लावल्याचे निदर्शनास आले यानंतर रेस्क्यू टीमने दोन दिवस शोध घेतल्यानंतर काल निलेश यांचा मृतदेह सापडला.