ह्युम पार्कमध्ये फुलांच्या विविध आकर्षक कलाकृती साकारणार, पर्यावरणप्रेमींमध्ये उत्सुकता
बेळगाव : बागायत खाते, जिल्हा पंचायत जिल्हा कृषी सोसायटी आणि जिल्हा प्रशासनातर्फे 13 ते 15 डिसेंबर दरम्यान क्लब रोड येथील ह्युम पार्कमध्ये 65 वे फल-पुष्प प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शनात विविध फळे, फुले आणि भाज्यांचे प्रकार पहावयास मिळणार आहेत. विशेषत: विविध फुलांच्या प्रतिकृती आकर्षण ठरणार आहे. फलोत्पादन मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार राजू सेठ राहणार आहेत. यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या विविध भाज्या, फळे, फुले, मसाले आदी पिके पहायला मिळणार आहेत. त्याबरोबर सौरपंपसेट, स्वयंचलित यंत्रे आणि विविध यंत्रसामग्रीही ठेवली जाणार आहे. त्याबरोबर मिरची, टोमॅटो, रताळी, सफरचंद, केळी, पेरू, पपई, नारळ आणि कंदमुळांचे एकत्रीकरण पहावयास मिळणार आहे. फुलांमध्ये गुलाब, पाम, जास्वंदी, जुई, झेंडू यासह 35 हून अधिक रोपट्यांचे प्रदर्शन होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य खुले राहणार आहे. तर दररोज सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहितीही बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यांनी दिली आहे.









