बागायत खात्याकडून आयोजन ः रंगीबेरंगी फुलांचे आकर्षण
प्रतिनिधी/ बेळगाव
बागायत शेतकरी आणि फल-पुष्पप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी बागायत खात्यामार्फत 8 नोव्हेंबरपासून फळ-पुष्प प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शनात विविध फळे आणि फुलांचे प्रदर्शन मांडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत, अशी माहिती बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यांनी दिली.
बागायत खात्यामार्फत दरवर्षी फल-पुष्प प्रदर्शन भरवून शेतकऱयांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रदर्शनात शेतकरी आपली फळे-फुले ठेवू शकतात. नागरिकांना फळांचा आणि फुलांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविले जात आहे. या प्रदर्शनात पेरू, लिंबू, नारळ, फणस, चिकू, पपई, अननस, डाळिंब, सफरचंद यासह परदेशी फळे ठेवली जाणार आहेत. त्यामुळे गुलाब, पाम, जास्वंदी, मोगरा, जाई, जुई, झेंडू, शेवंती यासह इतर कुट्रॉन्ससारखी फुले ठेवली जाणार आहेत. नवीन फळांची आणि फुलांची माहिती या प्रदर्शनातून दिली जाणार आहे.
‘गार्डन सजावट’ स्पर्धा
कोरोनामुळे मागील दोन वर्षात फल-पुष्प प्रदर्शनात खंड पडला होता. मात्र, यंदा पुन्हा प्रदर्शन भरविले जात आहे. या प्रदर्शनात शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱयांचा प्रतिसाद उदंड मिळतो. फुलांबरोबर बटाटा, रताळी, बीट, गाजर, मुळा यासह इतर फळभाज्यांची माहिती दिली जाणार आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘गार्डन सजावट’ स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱयांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 8, 9 आणि 10 नोव्हेंबर असे तीन दिवस चालणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खात्याने केले आहे.
प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन
यंदा पूर्ववतपणे फल-पुष्प प्रदर्शन भरविले जाणार आहे. या माध्यमातून विविध फळांची आणि फुलांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. याबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित केले जाणार आहेत. जिल्हय़ात फळांचे आणि फुलांचे क्षेत्र वाढावे आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे.
महांतेश मुरगोड (सहसंचालक बागायत खाते)









