हजारो नागरिकांची भेट : फळे, भाजीपाला, रोपटी-फुलांच्या प्रतिकृतींनी नागरिकांना भुरळ
बेळगाव : बागायत खाते व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने क्लब रोड, ह्यूमपार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय फल-पुष्प प्रदर्शनाची सांगता झाली. या प्रदर्शनात फळे, भाजीपाला, रंगीबेरंगी रोपटी आणि फुलांच्या प्रतिकृतींनी नागरिकांना भुरळ घातली. तब्बल 50 हजारहून अधिक पर्यावरणप्रमी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. बागायत खात्यामार्फत बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फल-पुष्प प्रदर्शन भरविले जाते. यामध्ये विविध प्रकारची फळे आणि फुलांची रोपटी ठेवली जातात. त्याचबरोबर सेंद्रीय शेती आणि फळ, फुलांबाबत अधिक माहिती दिली जाते.
यंदाच्या या प्रदर्शनात टॉवर, महात्मा गांधी, सैनिक फुलांमध्ये साकारण्यात आले आहेत. शिवाय सेल्फी पॉईंटदेखील तयार करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली होती. रविवारी शासकीय सुटीचा दिवस असल्याने कुटुंबासह प्रदर्शनात सहभागी झालेल्या नागरिकांची संख्या वाढली होती. विविध शाळांच्या सहलीही या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे बालचमूंचा किलबिलाट वाढला होता. या प्रदर्शनात विविध फळांबरोबरच गुलाब, मोगरा, जुई, पाम यासह 35 हून अधिक शोभिवंत रोपटी ठेवण्यात आली होती. एकाच छताखाली नागरिकांना विविध फळा-फुलांचे संवर्धन आणि देखभाल कशी करावी? याबाबत माहिती देण्यात आली.









