कोल्हापूर / धीरज बरगे :
जिल्ह्यातील गाळप हंगाम संपला असून अकरा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहे. जिल्ह्यात 15 मार्च 2025 पर्यंत सुमारे 224.77 कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. राज्य शासनाने दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे साखर कारखान्यांना आता एकरकमी एफआरपी द्यावी लागणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 14 दिवसानंतरच्या थकीत एफआरपीच्या रकमेवर 15 टक्के व्याजही साखर कारखान्यांना द्यावे लागणार आहे.
एफआरपी निश्चित करण्याचा कायदा केंद्रशासनाने केला आहे. त्यामध्ये फेरबदल करायचे अतसील तर ते केवळ केंद्र सरकारला अधिकार आहेत. 2022 मध्ये केंद्र सरकारने ज्या त्या राज्यांना ऊसाची एफआरपी ठरवण्याचा अधिकार दिला आहे. मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावून राज्य शासनाने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील शेतकरी संघटनांनी राज्यशासनाच्या या निर्णयाला विरोध करत उच्च न्यायालयात दाद मागितली. त्याबाबतचा न्यायालयाने निर्णय दिला असून एफआरपीची तुकडे पाडण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले. त्यामुळे आता साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्यावी लागणार आहे.
- 23 पैकी 11 कारखान्यांची एफआरपी थकीत
जिल्ह्यात एकूण 23 सहकारी व खाजगी साखर कारखाने आहेत. यापैकी 11 साखर कारखान्यांची एफआरपी थकीत आहे. थकबाकीची आकडेवारी पाहता सुमारे 224 कोटी 77 लाख रुपये इतकी एफआरपी थकीत आहे.
- सर्वाधिक थकबाकी भोगावती, कुंभीची
आकरा साखर कारखान्यांची एफआरीप थकीत असून यामध्ये सर्वाधिक 62.49 कोटी रुपये थकबाकी भोगावती साखर कारखान्याची आहे. तर त्या पाठोपाठ कुंभी–कासारी साखर कारखान्याची 41.31 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे.
- सांगली जिल्ह्यात 44.89 कोटी एफआरपी थकीत
सांगली जिल्ह्यातील 17 पैकी चार साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. 44.89 कोटी इतकी थकीत एफआरपीची रक्कम आहे. डॉ. नागनाथ अण्णा नाईकवडी 15.26, दत्त इंडिया 15.52, श्रीपती शुगर 8.95 आणि यशवंत शुगर साखर कारखान्याची 5.16 कोटी रुपये इतकी एफआरपी थकीत आहे.
- 15 टक्के व्याज देण्याचा आदेश द्यावा
उच्च न्यायालयाने राज्य शासनाचा दोन टप्प्यातील एफआरपीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आता एकरकमी एफआरपी द्यावी लागणार आहे. केंद्र सरकराच्या निर्णयानुसार 14 दिवसानंतरच्या थकीत एफआरपीच्या रक्कमेवर 15 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. त्यामुळे थकीत एफआरपीच्या रक्कमेवर व्याज देण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी संबंधित साखर कारखान्यांना द्याव्यात.
– धनाजी चुडमुंगे, संस्थापक अध्यक्ष आंदोलन अंकुश.
- एफआरपी थकवलेले साखर कारखाने आणि थकीत रक्कम पुढीलप्रमाणे :
साखर कारखाना थकीत एफआरपी (रक्कम कोटीमध्ये)
आजरा 13.17
भोगावती 62.49
छ.राजाराम 8.10
दूधगंगा–वेदगंगा बिद्री 10.90
सदाशिवराव मंडलिक हमिदवाडा 28.84
कुंभी–कासारी, कुडीत्रे 41.31
डॉ. डी. वाय. पाटील, गगनबावडा 3.46
गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी शिरोळ 12.93
इको–केन, म्हाळुंगे, चंदगड 27.15
अथणी शुगर्स, अंतुर्ली–तांभळे, भुदरगड 6.43
आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज 9.99
एकूण 224.77








