नॅशनल एअर क्लिन प्रोगामखाली अद्ययावत टँकर
कोल्हापूर
तुषार अंगावर पडले की एक छानशी लहर उठते. आता अशा तुषार लहरीचा अनुभव कोल्हापूरवासियांना अधून-मधून शहराच्या मुख्य रस्त्यावरून जाताना अनुभवायला मिळणार आहे. हे तुषार थंडगार पाण्याचे, पण यांत्रिक आहेत. पैशात सांगायचं झालं, तर हे तुषार 1 कोटी 32 लाख रुपयांच्या खास टँकरमधून उडणार आहेत. खड्डे आणि धुळीचा त्रास कमी करण्यास उपयोगी पडतील म्हणून हा तुषार उडवणारा टँकर कोल्हापुरातील रस्त्यावरून लवकरच धावणार आहे. अर्थात त्याचे दृश्य परिणाम त्यानंतरच कळणार आहेत.
एन.ए.सी.पी. म्हणजेच नॅशनल एअर क्लीन प्रोग्राम योजनेखाली महापालिकेकडे हा अद्ययावत टँकर आला आहे. ‘मल्टीपर्पज डस्ट सेपरेशन व्हेईकल’ असे त्याला म्हटले जाते. आरोग्य, स्वच्छता हाच हेतू डोळ्dयांसमोर ठेवून या अद्ययावत टँकरची बांधणी केली गेली आहे. त्याला पुढच्या बाजूस, कडेच्या दोन्ही बाजूस आणि आजूबाजूला पाण्याचे हलकेसे तुषार उडवणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा खूप अद्ययावत आहे. त्यातून तुषार उडतील, पण रस्ता किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या इतरांना ओले चिंब न करता हे तुषार फक्त धूळ खाली बसवतील, असे या यंत्रणेचे स्वरूप असल्याचे सांगितले जाते. देशातील काही मोठ्या शहरात अशी यंत्रणा कार्यान्वित आहे. कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी ही यंत्रणा आली आहे. पण अद्याप कार्यान्वित व्हायची आहे.
या यंत्रणेत तुषाराचे हलके झोत आहेत. तसेच अगदी उंचावर झाडाच्या पानावर साचलेली धूळ स्वच्छ करण्याइतके उंचही त्यात झोत आहेत. त्यासाठीच टँकरमध्येच एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आज ही यंत्रणा अद्ययावत वाटत असली तरी कोल्हापूर नगरपालिकेची कार्यपद्धती साधारण 50 वर्षांपूर्वी या यंत्रणेला पूरक अशी ठरणारी होती. अर्थात त्यावेळी शहर छोटे होते. शहरासाठी फक्त धूळशमन करण्यासाठी दोन टँकर होते. त्या टँकरच्यामागच्या बाजूस जागोजागी छिद्रे असलेली एक पाईप जोडलेली होती. त्यामुळे या पाईपमधून तुषार नव्हे, पण पाण्याच्या धारा रस्त्यावर पडत होत्या. संथ गतीने हा टँकर संध्याकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरत राहत होता. त्या पाण्याच्या धारात पाय भिजवण्याचा आनंद घेत लहान मुलांचा लोंढाच्या लोंढा त्या टँकरमागे धावायचा.
आता आलेल्या आधुनिक टँकरला पाणी फवारण्याची अतिशय अद्ययावत अशी यंत्रणा आहे. त्यासाठी प्रशिक्षित ड्रायव्हर व एक सहकारीच लागणार आहे. हे सारे तुषार यंत्रावर आधारित आहेत. त्यामुळे त्यात खूप सूक्ष्म असे बारकावे आहेत. रस्ता ओला चिंब न करताही ज्या मार्गावरून हा टँकर जाईल, त्या मार्गावरील धूळ काही काळ तरी हवेत मिसळणार नाही, अशी त्याची रचना आहे. अर्थात हा टँकर रस्त्यावर अजून धावलेला नाही. कोल्हापुरात खड्डे, खर-माती आणि धूळ याचेच या क्षणी साम्राज्य आहे. काही वर्षांनी नव्हे काही महिन्यात रस्ते खराब हे घडले आहे. आज डांबरीकरण आणि पुन्हा उद्या लगेच अन्य कामासाठी खुदाई, अशीही काही रस्त्यांची अवस्था आहे. त्या परिस्थितीत हे कृत्रिम तुषार किती हलकीशी लहर शहरातील धुळीच्या रस्त्यावर उमटवतात, हे लवकरच कोल्हापूरकरांना पहायला मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच शहरातील काही प्रमुख चौकांत असे तुषार फवारणारी व त्या-त्या चौकातील धूळ खाली बसवणारी एक यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. पण त्याचा परिणाम नेमका किती, हे अद्याप कळलेले नाही. कोल्हापूरकर तर या यंत्रणेला रंगीत कारंजा असेच म्हणतात. या पार्श्वभूमीवर ही टँकरची नवी यंत्रणा कशी कार्यरत राहील? आणि शहरातील धूळ कशी खाली बसवेल, याबद्दल शहरवासियांना साहजिकच उत्सुकता आहे.
Previous Article31 नक्षलींचा खात्मा, दोन जवान हुतात्मा
Next Article पाणीसाठा मुबलक, तरीही काटकसर आवश्यक








