खेड :
शिमगोत्सवाची 13 मार्चपासून धामधूम सुरू होणार आहे. ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी चाकरमान्यांची गावी येण्यासाठी लगबगही सुरू झाली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने शिमगोत्सवासाठी जाहीर केलेल्या 3 होळी स्पेशल गाड्यांची गुरूवारपासून धडधड सुरू होणार आहे. सीएसएमटी–मडगाव, एलटीटी–मडगाव, एलटीटी–तिरुवअनंतपूरम होळी स्पेशलसह पनवेल–चिपळूण मेमू स्पेशलचा समावेश आहे.
01151/01152 क्रमांकाची सीएसएमटी–मडगाव होळी स्पेशल 13 मार्च रोजी धावेल. सीएसएमटी मुंबई येथून रात्री 12.20 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता मडगाव येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून दुपारी 2.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता एलटीटीला पोहचेल. 01129/01130 क्रमांकाची एलटीटी–मडगाव स्पेशल 13 व 20 मार्च रोजी धावणारी स्पेशल एलटीटीहून रात्री 10.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 12.45 वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात 14 व 21 मार्च रोजी धावणारी स्पेशल मडगाव येथून दुपारी 1.40 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 5 मिनिटांनी एलटीटीला पोहचेल.
01063/01064 क्रमांकाची एलटीटी–तिरुवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशल 13 मार्च रोजी धावेल. एलटीटीहून सायंकाळी 4 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता तिरुवअनंतपूरम येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात 15 मार्च रोजी धावणारी स्पेशल तिरुवअनंतपूरम येथून सायंकाळी 4.20 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी रात्री 12.45 वाजता एलटीटीला पोहचेल.
- कोकणात धावणार 195 जादा बसेस
शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने 195 जादा बसफेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर 17 मार्चपर्यंत जादा बसफेऱ्या धावणार आहेत. खेड, चिपळूण, गुहागर, कणकवली, रत्नागिरी, गणपतीपुळे आदी ठिकाणी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.








