जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीचे लक्ष आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये दुहेरी किताब मिळविण्याकडे राहणार आहे.
रविवारी हम्पीने इंडोनेशियाच्या इरिन सुकंदरला हरवून फिडे महिला जागतिक जलद बुद्धिबळ विजेतेपद पटकावले भारतीय बुद्धिबळसाठी वर्षाची समाप्ती सनसनाटी पद्धतीने केली. भारतीय खेळाडूने 2019 मध्ये जॉर्जिया येथे ही स्पर्धा जिंकली होती आणि रविवारी ती चीनच्या जू वेनजुननंतर विजेतेपद दुसऱ्यांदा जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली. आता केवळ आणखी एक विजेतेपदच नाही, तर आणखी 60,000 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 50 लाख ऊपये) जिंकण्याची संधी तिच्यासमोर आहे.
कारण ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये जलद बुद्धिबळ स्पर्धेइतकीच बक्षीस रक्कम आहे. मजबूत भारतीय पथक या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे, ज्यामध्ये खुल्या गटात 13 आणि महिला विभागात 11 फेऱ्या असतील. आणखी एक भारतीय खेळाडू द्रोणवल्ली हरिका ही देखील ब्लिट्झमध्ये ताकदवान खेळाडू राहिलेली आहे. चाहते आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांच्याकडूनही सुधारित कामगिरीची अपेक्षा करतील. या दोघीही जलद बुद्धिबळ स्पर्धेत प्रभाव टाकू शकल्या नाहीत.
खुल्या विभागात मॅग्नस कार्लसन, ज्याला ड्रेस कोडच्या उल्लंघनामुळे जलद स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले होते, तो विजेतेपदाचा सर्वांत भक्कम दावेदार म्हणून सुऊवात करेल. भारताचा आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी, फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह हे सर्व नॉर्वेच्या खेळाडूला आव्हान देऊ शकतात. रशियाच्या 18 वर्षीय वोलोदार मुर्झिनने जलद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद जिंकले. हे जेतेपद पटकावण्याची संधी एरिगेसीसमोर होती, पण त्याने ती गमावली. आता 2026 च्या पॅंडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी त्याला नव्याने संघर्ष करावा लागेल.









