पेपर फुटीच्या गंभीर प्रकारासह 558 कॉपी केसेस, परीक्षांच्या वेळेत निकालाचे कौतुक
अहिल्या परकाळे कोल्हापूर
कोरोनामुळे शिवाजी विद्यापीठांतर्गत सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून परीक्षा अन् निकालही उशिरा लागले होते. परिणामी, शैक्षणिक वर्षही उशिरा सुरू झाले. हीच घडी बसवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आटोकाट प्रयत्न करत, सत्र संपल्यावर लगेच दुसरे सत्र सुरू करून परीक्षा वेळेत घेत निकालही शासन निर्देशानुसार वेळेत जाहीर केले. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 वेळेत सुरू होणार आहे. परंतु परीक्षेदरम्यान घडलेले कॉपीचे गैरप्रकार व पेपर फुटीचा निकाल कधी लागणार, याची चर्चा आहे.
विद्यापीठाची सेमिस्टर वेळेत सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आंदोलने करून निवेदन दिले. यावर राज्य सरकारने सेमिस्टर कधी सुरू करायची, पेपर कधी घ्यायचे व निकाल किती दिवसात जाहीर करायचे, याचा फतवा काढला. त्यानुसार विद्यापीठाने वेळापत्रक तयार करून सेमिस्टर संपल्यानंतर लगेच परीक्षा घेतल्या. परीक्षा संपल्यानंतर 580 विषयांच्या परीक्षांना प्रारंभ केला. त्यापैकी 414 परीक्षांचे निकाल परीक्षेनंतर 2 ते 20 दिवसांत जाहीर केले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, नोकरीचा मार्ग रिकामा झाला आहे.
परीक्षांदरम्यान घडलेले कॉपीचे गैरप्रकार, पेपरफुटीतील दोषींवर कोणताही निर्णय झालेला नाही. कॉपीमध्ये दोषी असलेल्या काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. काहेंची परीक्षा प्रमाद समितीसमोर सुनावणी झाली आहे. काहींसंदर्भात सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. संशयितांवर कारवाई करून योग्य तो निर्णय परीक्षा प्रमाद समितीने जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
परीक्षा विभागाची तारेवरची कसरत
निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा विभाग, पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागली, हे खरे आहे. परंतु कोरोनानंतर विस्कटलेली परीक्षेची घडी बसवण्याचा परीक्षा विभागाने चांगला प्रयत्न केला आहे. त्याला महाविद्यालयांनी चांगली साथ दिली. परंतु या विभागाला पेपरफुटीमुळे गालबोट लागल्याने गोपनीयताही भंग झाली आहे.
आतापर्यंत 558 कॉपींचे प्रकार
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा विभागाने भरारी पथके नियुक्त केली या पथकांनी आतापर्यंत 558 कॉपीचे प्रकार समितीकडे नोंदवले. प्रमाद समितीने संबंधीत कार्हींना सुनावणीसाठी बोलावले. परंतु काहींवर कारवाई प्रलंबित आहे.
पेपर फुटीची अद्याप सुनावणी सुरू
बी.कॉम. सेमिस्टर सहाचा अॅडव्हान्स अकौंटन्सीचा पेपर फुटला होता. याप्रकरणी संबंधीत महाविद्यालयातील एसआरपीडी समन्वयक, इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची सुनावणी परीक्षा प्रमाद समितीसमोर सुरू आहे. फुटलेलाच पेपर घेतलेल्या महाविद्यालयांची पुनर्परीक्षा घेतली. या परीक्षांचे निकालही जाहीर झाले. परंतु चौकशी सत्र अद्याप सुरू आहे. संबंधीत महाविद्यालयाने परीक्षेच्या कामातून दोषींना निलंबित केले आहे. पण परीक्षा प्रमाद समिती आणखी किती दिवस याची चौकशी करणार असा प्रश्न आहे. होणाऱ्या कारवाईकडेही लक्ष लागले आहे.
पुढच्या आठवड्यात पेपर फुटीवर अंतिम निर्णय
पेपरफुटी प्रकरणी परीक्षा प्रमाद समितीच्या तीन ते चार बैठका झाल्या आहेत. पुढच्या आठवड्यात प्रमाद समिती अंतिम निर्णय जाहीर करेल.
डॉ. अजितसिंह जाधव- (संचालक, परीक्षा व मूल्य मापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ)








