मनपाकडून कानडीकरणाचा वरवंटा : दैनंदिन कामकाज केवळ कानडी भाषेतून चालणार
बेळगाव : शासकीय कार्यालयातील कामकाज केवळ कन्नड भाषेतूनच करण्यात यावे, कन्नड भाषेलाच अधिक प्राधान्य देण्यात यावे, असा फतवा राज्य सरकारच्या सचिव शालिनी रजनीश यांनी नुकताच काढला आहे. त्यामुळे याची बेळगाव महानगरपालिकेकडून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. विविध विभागाबाहेरील कक्षासमोर केवळ कन्नड भाषेतच फलक लावले जात आहेत. इतकेच नव्हे तर सभागृहातील नगरसेवकांचे नामफलक कन्नड भाषेत बनविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापुढे बैठकांचा अजेंडाही केवळ कन्नड भाषेतूनच दिला जाणार आहे.
कन्नडव्यतिरिक्त इंग्रजी व अन्य भाषेचा वापर केल्यास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्तांनी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी बेळगाव महानगरपालिकेकडून कन्नड, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषेतून शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यांवर फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सरकारी कार्यालयातील कामकाज बऱ्याच वेळा इंग्रजी भाषेतूनच करण्यात येत होते. मात्र, यापुढे सर्व कामकाज कन्नड भाषेतूनच करण्यात यावे, फलक त्याचबरोबर पत्रव्यवहार, दैनंदिन कामकाज करताना कन्नड भाषेलाच प्राधान्य द्यावे, असा फतवा राज्य सरकारने काढला आहे.
आदेशाची प्रत बेळगाव मनपाला प्राप्त होताच मनपा आयुक्त शुभा बी. यांनी कानडीकरणास सुरुवात केली आहे. विविध कक्षांबाहेर कन्नड आणि इंग्रजी भाषेतील फलक लावण्यात आले होते. मात्र, ते हटवून केवळ कन्नड भाषेतील फलक लावण्यात आले आहेत. तसेच सर्वसाधारण सभा व इतर बैठकांची नोटीस व अजेंडा कन्नड आणि इंग्रजी भाषेत दिला जात होता. मात्र, यापुढे केवळ कन्नड भाषेतूनच अजेंडा दिला जाणार असल्याची माहिती कौन्सिल विभागातून दिली जात आहे. मुख्य सभागृहात नगरसेवकांचे नामफलक इंग्रजी भाषेत होते. तेदेखील आता कन्नड भाषेत लिहिण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कौन्सिल विभागाला सर्व कारभार कन्नड भाषेतून केला पाहिजे, अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्तांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कौन्सिल विभागाकडून 2 जुलैच्या स्थायी समितीच्या निवडणुकीच्या तयारीबरोबरच इतर सर्व कामकाज कन्नड भाषेतून करण्यासाठी अधिकारी कामाला लागले आहेत.









