केंद्र सरकारसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध : विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी /पर्वरी
पेन्ह दी फ्रान्स पंचयातीची ग्रामसभा रविवारी म्हादई पाणीप्रश्न आणि पंचायत क्षेत्रातील काही भाग पणजी महानगर पालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाबाबत बरीच गाजली. तसेच पंचायत मंडळाने नवीन मेगा प्रकल्प व अन्य बांधकामानांना परवानगी देताना साधनसुविधांचा विचार करून परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थानी केली. ग्रामसभेत सरपंच स्वप्नील चोडणकर यांच्यासह सचिव सुरेश फडते, पंचसदस्य विश्र्रांती देसाई, अॅड. शांताराम नाईक, घनश्याम नाईक, सिद्धेश नाईक, सफर फडते, पुष्पराज शिरोडकर, माटिल्डा वाझ, निरीक्षक म्हणूक हेमंत मडकईकर उपस्थित होते. जेटीवरील बोटींमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी, भटकी कुत्री, पुरातन बिठ्ठोण धक्का, मोबाईल टॉवर, स्व्रॅपयार्ड या विषयांबरोबरच विकास कामाबद्दल ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रŽांना सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी समर्पक उत्तरे दिली.
अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध!
केंद्र सरकारने गोवा राज्याचा घात केला असून आगामी कर्नाटक राज्याच्या निवडणुका असल्यामुळे म्हादई नदीचे पाणी वळविण्यास परवानगी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला. त्या विरोधात ठराव ही घेण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांनी या पंचायतीने घेतलेल्या निषेध ठरावाची प्रत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यांना सादर करावी, अशी मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा ग्रामस्थांनी निषेध केला.
पणजी महानगरपालिकेत काही भाग समाविष्ट करण्यास विरोध
पेन्ह दी फ्रान्स पंचयातीतील काही भाग पणजी महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा नगर नियोजन खात्याने घाट घातल्याबद्दल सरकारच्या या कृतीला उपस्थित ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच हा भाग पणजी महापालिकेत समावेश करण्यामागे कोणाचा तरी फायदा आहे. या पंचायत क्षेत्रातील कोणताही भाग पणजी महानगरपालिकेत समाविष्ट करू नये, असा ठराव यावेळी मांडण्यात करण्यात आला. या ठरावाची प्रत नगर नियोजनमंत्र्याना आणि नगर नियोजन खात्याला पाठवावी. यावर तोंडी आश्वासन न देता लेखी आश्वासन देण्याची आग्रही मागणी केली. यावर सरपंच चोडणकर यांनी आम्ही नगर नियोजन खात्याबरोबर पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक आमदार खंवटे यांचाही या प्रक्रियेला विरोध आहे, असे सांगितले. पंचायत क्षेत्रातील पार्क, मैदाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असून त्यांचा तेथे राहणाऱ्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यासाठी तेथे एखादा देखरेखीसाठी कर्मचारी नेमावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. प्रारंभी सचिव सुरेश फडते यांनी मागील ग्रामसभेच्या अहवालाचे वाचन करून मंजूर करून घेतले. शेवटी पंच अॅड. शांताराम नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.









