आटपाडी / सूरज मुल्ला :
सर्वसामान्य कुटुंबातून जिद्दीने ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर विराजमान होण्याची किमया करगणी (ता.आटपाडी) येथील नाना माने यांनी केली आहे. परस्थितीमुळे फक्त आठवीपर्यंतचेच शिक्षण घेतलेल्या करगणीच्च्या या सुपुत्राने प्रसिध्द सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत केबीसीचा मंच लक्षवेधी बनविला.
करगणी येथील सर्वसामान्य कुटुंबातील वसंत माने यांचे सुपुत्र असलेल्या नाना यांना घरच्या आर्थिक स्थितीमुळे, कौटुंबिक समरयांमुळे शिक्षण घेता आले नाही. त्यांनी मानेवरती प्राथमिक शाळेत आणि नंतर श्रीराम हायस्कुलमध्ये शिक्षण घेतले. आर्थिक समस्यांमुळे त्यांना फक्त इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण घेता आले. त्यानंतर मात्र कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मोलमजुरीला प्राधान्य दिले. मजुरी, शेती असा ‘मजल दर मजल करत’ नाना माने यांचा प्रवास चालला.
तत्कालीन दुष्काळी स्थितीमुळे शेतीही अशक्य होती. परंतु परस्थितीपुढे हतबल होण्याऐवजी लढण्याला नाना माने यांच्यासह कुटुंबियांनी प्राधान्य दिले. टेलिव्हिजन जगतात केबीसी म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम सुरू झाला. तेंव्हापासून त्या कार्यक्रमाची आवड नाना माने यांना झाली. प्रत्येक कार्यक्रम पाहणे, नियमीत वाचन करणे, प्रश्नांची उत्तरे शोधण्याची त्यांना सवयच जडली.
एक दिवस केबीसीच्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसायचेच, असा संकल्प केलेल्या माने यांना करोडो लोकांमधून संधी मिळणे कठीण होते. पण, ते हतबल झाले नाहीत. मजुरी, कष्ट करण्यापासून ते कधीच मागे हटले नाहीत. त्यांना सदैव आई वैजंता, पत्नी प्रियांका यांनी प्रोत्साहन, पाठबळ दिले. हतबल होण्याऐवजी लढण्यावर विश्वास असलेल्या माने यांनी ‘आठवीतून शाळा सुटलीतरी शिक्षण’ सोडले नाही.
कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सिटवर बसण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न नाना माने यांनी जपले. त्यासाठी मिळेल, त्या साधनांचे वाचन कायम ठेवले. करोडो स्पर्धकांमधून माने यांच्या रूपाने करगणीचा सुपुत्र अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसला. त्यांच्या स्पर्धेत डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षीत मंडळी होती. त्यातून यशस्वी वाटचाल करत यश मिळविले. अमिताभ बच्चन यांनी नाना माने यांच्या वाटचालीचे विशेष कौतुक केले. केबीसीच्या मंचावर माने यांनी १२ लाख ५० हजार जिंकले व एक जपलेले स्वप्न कष्टकरी तरूणाने पूर्णत्वास नेले.
फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेवून केबीसीच्या हॉट सीटवर पोहचून माने यांनी जिद्द असेलतर काहीही साध्य होईल, हे दाखवून दिले. त्यांच्या यशामुळे करगणीसह आटपाडी तालुक्याचा मोठा सन्मान झाला. तसेच माने यांच्यामुळे कष्टाचा व शाळेशिवाय मिळालेल्या ज्ञानाचाही सन्मान झाला आहे. केबीसीच्या व्यासपीठावरून माने यांनी जगासमोर दाखविलेले ज्ञान व मिळविलेले यश कौतुकाचा विषय बनले आहे.








