डबल इंजीन सरकार निवडण्याचे आवाहन
बेळगाव : भाजपने देशात विकासाचे नवे मॉडेल तयार केले. आज अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून देश भरभराटीकडे वाटचाल करीत आहे. बेळगावसह कर्नाटकातही भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असून डबल इंजीनच्या सरकारच्या माध्यमातून कर्नाटकचा विकास केला जाईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. भाजपचे बेळगाव उत्तरचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ सदाशिवनगर येथे आयोजित प्रचारसभेत डॉ. सावंत बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन, उपमहापौर रेश्मा पाटील, भाजप नेते किरण जाधव उपस्थित होते. सदाशिवनगर, आंबेडकरनगर, विश्वेश्वरय्यानगर, रेलनगर या परिसरात पदयात्रा काढून प्रचार करण्यात आला. त्याचबरोबर गांधीनगर येथील फळ व फूल मार्केट येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
चव्हाट गल्ली येथे जल्लोषात स्वागत
रविवारी सायंकाळी चव्हाट गल्ली येथे प्रचारफेरी काढण्यात आली. हिंदुत्वासाठी व हिंदुराष्ट्र निर्माणासाठी भारतीय जनता पक्षाला भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला. डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य फेरी काढून मतयाचना करण्यात आली. चव्हाट गल्ली हा भाजपचा बालेकिल्ला राहिला असून यावेळीही सर्वाधिक मतदान चव्हाट गल्लीतून होईल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला.
खडक गल्लीत स्वागत कमानी
डॉ. रवी पाटील यांनी खडक गल्ली येथे जोरदार प्रचार केला. गल्लीतील मरगाई मंदिर येथून प्रचाराला प्रारंभ झाला. भाजपने बेळगाव उत्तरमध्ये केलेल्या विकासकामांचा दाखला देत डॉ. रवी पाटील यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. यानिमित्त गल्लीमध्ये बॅनर उभारून डॉ. रवी पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मंडळांच्या फलकांवर डॉ. रवी पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकले.









