मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे उद्गार : पंतप्रधान मोदी समजून घेण्यासाठी ‘मोदी ऍट 20’ वाचावे
प्रतिनिधी /फोंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लाभलेले उत्तुंग नेतृत्व असून कृषी क्षेत्रापासून परराष्ट्र धोरणापर्यंत त्यांनी देशाला एक नवीन दिशा दिलेली आहे. महात्मा गांधीनंतर स्वच्छतेचे महत्त्व देशवासियांना कृतीतून पटवून देताना, हाती झाडू घेणारे ते पहिले राष्ट्रीय नेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदी केवळ योजना आखत नाहीत, तर त्यांचा प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून पाठपुरावाही करुन घेतात. जनतेशी थेट संवाद साधणारे व जनतेच्या मनात आदर असलेले ते लोकप्रिय पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी समजून घेण्यासाठी प्रत्येक युवकाने ‘मोदी ऍट 20’ हे पुस्तक आवर्जुन वाचावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान या वीस वर्षांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱया ‘मोदी ऍट 20’ या पुस्तकावर फर्मागुडी येथील पीईएस रवी नाईक महाविद्यालयात आयोजित केलेल्या परिसंवादात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
या पुस्तकात गृहमंत्री अमित शहापासून सुधा मूर्ती, पीव्ही. सिंधू अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आपले अनुभव लिहिले आहेत. कार्यक्रमाला व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, कृषीमंत्री रवी नाईक, प्रेमानंद म्हांबरे, प्रमुख वक्ते अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, डॉ. दत्तेश परुळेकर, गिरीराज पै वेर्णेकर, पीईएस संस्थेचे सचिव नगराध्यक्ष रितेश नाईक, पीईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास पिसुर्लेकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. म्हामले देसाई व प्रकाश अहिरे हे उपस्थित होते.
संघटन कुशलता हे मोंदीचे सामर्थ्य : वेर्णेकर
संघटन कुशलता हे पंतप्रधान मोदींचे सर्वात मोठे सामर्थ्य असून ‘नेशन फर्स्ट’ ही त्यांची धारणा आहे. त्यांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी प्रत्येक युवकाने त्यांच्यावरील हे पुस्तक वाचावे, असे गिरीराज वेर्णेकर यांनी सांगितले. हे पुस्तक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय यशोगाथा आहे, असे ऍड. नरेंद्र सावईकर म्हणाले. एक सामान्य कार्यकर्ता ते देशाचे पंतप्रधान हा मोदींचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींचे देशाशी भावनिक नाते : डॉ. परुळेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाशी भावनिक नाते आहे. त्यामुळेच ते दिवाळी सण सीमेवर पहारा देणाऱया सैनिकांसोबत साजरी करतात. खेळाडूंचे व वैज्ञानिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांची थेट भेट घेतात. ‘नेशन फर्स्ट’ हा त्यांचा नारा आहे, असे डॉ. दत्तेश परुळेकर यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हे देशाला लाभलेले सक्षम नेतृत्व आहे. कोरोना महामारीच्या जागतिक संकटात त्यांच्या नेतृत्त्वाची कसोटी दिसून आली. युवकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत, असे मंत्री रवी नाईक म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी समजून घेण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयाने व खास करून युवकांनी हे पुस्तक वाचण्याचे आवाहन सदानंद तानावडे यांनी केले. रुचा बर्वे यांनी स्वागतगीत सादर केले. प्राचार्य डॉ. पिसुर्लेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. मिता आमोणकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला तर अंचित शेट पारकर यांनी आभार मानले.









