ममता बॅनर्जींच्या भूमिकेत बदल : काँग्रेस मात्र आक्रमकच
वृत्तसंस्था/ कोलकाता
इंडिया या आघाडीच्या बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:ची भूमिका बदलली आहे. माकपवर टीका करत त्यांनी काँग्रेसबद्दल मौन बाळगण्याचे सत्र आरंभिले आहे. भाजपविरोधात स्थापन विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील झाल्याने आणि काँग्रेस नेतृत्वासोबत मधूर संबंध प्रस्थापित झाल्याने त्यांनी हा बदल केला आहे. तर यापूर्वी त्यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला होता. याचबरोबर राज्यातील काँग्रेसचा एकमेव आमदारही स्वत:च्या पक्षात आणला होता.
ममता बॅनर्जींच्या उलट पश्चिम बंगाल काँग्रेसने तृणमूलला लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते भ्रष्ट असून स्थानिक अधिकारी आणि राज्य प्रशासन तृणमूल काँग्रेसच्या निर्देशावर काम करत असल्याचा आरोप पश्चिम बंगाल काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
बेंगळूर येथील आयोजित दुसऱ्या बैठकीत काँग्रेस अन् त्णमूल काँग्रेसदरम्यान जवळीक दिसून आली होती. 2011 मध्ये ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या मदतीने सत्तेवर आल्या होत्या. बंगालच्या जनतेचा ममता बॅनर्जी यांनी अपेक्षाभंग केला आहे. याचमुळे ममता बॅनर्जी आता काँग्रेसला सोबत घेऊ पाहत आहेत असा दावा चौधरी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने पूर्ण देशाला एकजूट केले आहे. राहुल गांधींचे नेतृत्व समग्र स्वरुपात भारतात बदलाचे स्पष्ट संकेत देणारे आहे. राहुल गांधी यांच्यासोबत न आल्यास पक्षात फूट पडणार असल्याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झाली असावी असे चौधरींनी म्हटले आहे.
तृणमूलचे प्रत्युत्तर
आघाडी विचारात घेत तृणमूलकडून काँग्रेसवर टीका केली जाणार नाही. तृणमूल काँग्रेस 180 हून अधिक जागांसोबत राज्यात सत्तेवर आला आहे. तर काँग्रेस शून्यावर पोहोचला आहे. आघाडीचा अर्थ आम्ही कमकुवत झालो असा कुणी घेऊ नये. पश्चिम बंगालमध्ये भाजपविरोधात लढण्यास तृणमूल काँग्रेस समर्थ आहे, आम्हाला कुणाच्या मदतीची गरज नसल्याचे उद्गार तृणमूल नेते शांतनू सेन यांनी काढले आहेत.









