कोल्हापूर :
हनुमाननगर परिसरात वृद्ध रिक्षाचलकाचा मोहन सुर्यकांत पोवार (वय 70 रा. हनुमान नगर) याचा गळा चिरुन आणि डोक्यात घाव घालत निर्घुण खून करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये छडा लावत चंद्रकांत केदारी शेळके (वय 73 रा. मनोरमा नगर, मोहीते मळा) याला अटक केली. मयत मोहन पोवार व संशयीत आरोपी चंद्रकांत शेळके हे दोघे महाविद्यालयापासून मित्र होते. मोहन पोवार याने आईवरुन शिवीगाळ केल्यानेच खून केल्याची कबूली संशयीत चंद्रकांत शेळके याने पोलिसांसमोर दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रिक्षा व्यवासाय करणारे मोहन पोवार व त्यांचा मुलगा पुष्कराज हे दोघे हनुमान नगर येथे राहतात. मोहन पोवार यांच्या पत्नीचे चार वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांचा मुलगा पुष्कराज हा नुकताच एका इंजिनिअरींग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरीस लागला आहे. गुरुवारी सकाळी पुष्काराज आठ वाजण्याच्या सुमारास कॉलेजसाठी गेला. यावेळी त्याने वडीलांना देवपूजा करा मी दुपार पर्यंत येतो असे सांगून बाहेर पडला.
- धुरामुळे खूनाच्या घटनेला वाचा
मोहन पोवार यांच्या घरातून धुर येत असल्याचे शेजारी चंद्रनील कुलकर्णी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती सचिन हिलगे यांना दिली. सचिन हिलगे यांनी मोहन पोवार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन न उचल्यामुळे चंद्रनील व सचिन हे दोघे मोहन पोवार यांच्या घराकडे गेले. त्यांनी या घटनेची माहिती पोवार यांचा मुलगा पुष्कराज याला दिली. मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे किचनमधील दरवाजा तोडून या दोघांनी घरामध्ये प्रवेश केला असता, घरात सर्वत्र धूर पसरला होता. या दोघांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. दरम्यान पोवार यांचा मुलगा पुष्कराज व भाचा हर्षद खडके हे घटनास्थळी दाखल झाले.
घरातील धुर कमी झाल्यानंतर मोहन पोवार हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. या नंतर या खूनाच्या घटनेला वाचा फुटली. घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, शहर पोलीस उपअधिक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. फॉरेन्सिक पथकास घटनास्थळी पाचारण करुन नमुने घेण्यात आले.
- समईने आग लावण्याचा प्रयत्न
हल्लेखोराने मोहन पोवार यांचा खून केल्यानंतर त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोवार यांच्या घरामध्ये असणाऱ्या मंदिरातील एक समई मृतदेहा शेजारी आढळून आली. याच समईच्या सहाय्याने हल्लेखोरानो घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला, समईच्या सहाय्याने बेडवरील गादीला आग लावण्याचा प्रयत्न केला.
- काल सत्कार आणि आज खून
मोहन पोवार यांचा बुधवारी सायंकाळी हनुमान नगर तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते, यामध्येच मोहन पोवार यांचा सत्कार केला होता. कालच सत्कार आणी आज खून झाला. मोहन पोवार हे मनमिळावू आणि सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित करुन होते, यामुळे पोवार यांच्या खूनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत होती. वडीलांच्या खूनानंतर मुलगा पुष्कराज याने केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. सकाळीच सगळे व्यवस्थीत होते, आणी अवघ्या काही तासात होत्याचे नव्हते झाल्याचे तो सांगत होता.
- बेडरुममध्ये रक्ताचे थारोळे
मोहन पोवार यांचा मृतदेह बेडरुममध्ये आढळून आला. त्याच्या गळ्यावर आणी डोक्यावर वर्मी घाव करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, तसेच घराच्या भिंतीवर आणि बेडरुममधील कपाटावर रक्ताचे डाग परसले होते. हल्लेखोराने समई आणी चाकूने पोवार यांच्यावर वार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी बेडरुममधून एक चाकू, एक ब्लेड आणि रक्त लागलेली समई जप्त केली आहे. मोहन पोवार याचा तुटलेला चेष्माही घटनास्थळी पडला होता.
- मृतदेह जळाला
हल्लेखोराने घरातील सर्व साहित्य विस्कटले होते. कपडे, गादी आणि कपाटातील साहित्य बाहेर काढून घराला आग लावण्याचा प्रयत्न केला यामुळे मृतदेहही काही प्रमाणात जळला असल्याची माहिती समोर आली आहे.
- सहा तासात खूनाचा उलगडा
पोवार यांच्या घरासमोर असणाऱ्या एका बंगल्यामधील सिसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये 11 वाजण्याच्या सुमारास एक वयस्कर व्यक्ती घरामध्ये शिरताना दिसत होत. हाच धागा पकडून पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्ही फुटेजची लिंक जोडली असता, चंद्रकांत शेळके याच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. त्याला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरातून ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर चंद्रकांत शेळके याने खूनाची कबूली दिली. गुरुवारी सकाळी 10 वाजता पोवार यांच्या घरात गेलो. यानंतर दोघेही चहा पित बसले. चहा पित असतानाच पोवार आणि शेळके यांच्यात वाद झाला. याचा वादातून चाकू आणी समईने पोवारच्या गळ्यावर आणी डोक्यात वार केल्याची कबूली दिली. जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संयुक्त तपास करत सहा तासात खूनाचा छडा लावला. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस अंमलदार प्रविण सावंत, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, मोहन लगारे, वैभव पाटील, शुभम संकपाळ, समीर कांबळे यांनी हा तपास केला.








