कोल्हापूर :
मित्राकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून आकाश शांताराम बोराडे (वय 23 रा. आर. के. नगर, मूळ धाराशिव) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी करवीर पोलिसांनी ओंकार सुनील सावंत (रा. जुना बुधवार पेठ) याला रविवारी अटक केली. गुरुवारी (15 मे) रोजी रात्री 11 च्या सुमारास आर. के. नगर येथे ही घटना घडली होती.
याबाबत माहिती अशी, कतराबाद (धाराशिव) येथील आकाश बोराडे हा केआयटी महाविद्यालयामध्ये एमबीएच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत होता. नुकतीच त्याने अंतिम वर्षाची शेवटची परिक्षा दिली होती. एका मॉलमध्ये त्याची डिपार्टमेंट व्यवस्थापक म्हणून नेमणूकही झाली होती. मात्र काही दिवसांपासून आकाश ताण–तणावामध्ये वावरत होता. त्याने याचे कारण नातेवाईकांनाही सांगितले होते. गुरुवारी रात्री आकाशने आर. के. नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाशच्या मृतदेहाजवळ 4 पानांची चिठ्ठी होती. यामध्ये त्याने मित्र ओंकार सावंत याच्याकडून आपल्याला दोन वर्षापासून शारिरिक व मानसिक त्रास होत असल्याचे नमूद केले होते. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले. यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी ओंकार सावंत याला ताब्यात घेतले. रविवारी मृत आकाशचा सख्खा भाऊ विनायक बोराडे याने करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर ओंकार सावंत याला अटक केली. ओंकारला आज (सोमवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
- 2 मोबाईल जप्त
दरम्यान, पोलिसांनी मयत आकाशचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. यामध्ये आणखी काही माहिती मिळते काय? याचा शोध सुरु आहे. तसेच आरोपी ओंकार सावंतचाही मोबाईल जप्त करण्यात येणार आहे.
- डेटिंग अॅपवरुन ओळख
मृत आकाश आणि संशयित आरोपी ओंकार यांची ओळख दोन वर्षापूर्वी एका ऑनलाईन डेटिंग अॅपमधून झाली होती. यानंतर या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली होती. अशी माहिती तपासामध्ये समोर आली आहे.








