राजभाषा, गोवा घटकराज्यचा घेतलाय आढावा
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लुईझिन फालेरो यांनी ‘कोकणीला राजभाषेचा दर्जा आणि गोव्याला घटक राज्याचा दर्जा’ प्राप्त करण्यासाठी जे आंदोलन झाले, त्याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. त्या लेखांचा संग्रह तयार केला असून या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शुक्रवार दि. 22 सप्टेंबर रोजी सांय. 4 वा. राजभवनच्या जुन्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.
गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळवायला हवा तर राज्याची अधिकृत भाषा अगोदर निश्चित व्हायला हवी होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे आश्वासन 1980 च्या दरम्यान लुईझिन फालेरो यांना दिले होते. मगो पक्षाला सत्तेपासून दूर कऊन काँग्रेसने 1980 मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर लुईझिन फालेरो यांनी कोकणी भाषा आणि घटक राज्याचा दर्जा हे दोन्ही विषय प्रामुख्याने घेतले. हे विषय हाती घेतल्यानंतर गोव्यात फार मोठे राजकीय आंदोलन झाले. सत्ताधारी काँग्रेस पक्षामध्ये देखील मतभिन्नता होती. विरोधी पक्ष मगो होता. या पक्षाने देखील मराठीची बाजू उचलून धऊन गोव्यात जोरदार आंदोलन उभारले होते.
लुईझिन फालेरो यांचे हे पुस्तक केवळ कोकणी भाषेसाठी झालेल्या आंदोलनाशी निगडीत आहे. कोकणीसाठी कसा संघर्ष करावा लागला, 1980 ते 1987 मध्ये घटक राज्याचा दर्जा मिळेपर्यंतचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. गोवा मुक्तीनंतर गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळविण्यासाठी 26 वर्षे जावी लागली असे त्यांचे म्हणणे आहे. गोवा घटक राज्याचा दर्जा व कोकणी भाषेसाठी आंदोलन हा एक मोठा इतिहास आहे. लुईझिन फालेरो यांनी घटकराज्य व राजभाषेसाठी जी भूमिका बजावलेली आहे, तिचाही उल्लेख पुस्तकात केलेला आहे. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. फ्रन्सिस्को लुईस गोमीश स्मृती ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे. गोव्यातील बहुतांश सर्व राजकीय नेत्यांना फालेरो यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले आहे.









