अध्याय अकरावा
जेथे गणेशगीता आहे तेथे साक्षात बाप्पा रहात असतात हे लक्षात घेऊन भाविकांनी गणेशगीतेचे नित्य श्रवण पठण श्रद्धेने करावे म्हणजे मन सतत बाप्पांच्या अनुसंधानात राहील. नित्य वस्तू कोणती आहे हे समजल्याने ती प्राप्त करून घेण्याच्या नादात त्याला समोर दिसणाऱ्या नाशवंत वस्तू निरर्थक वाटू लागतील. सततच्या प्रयत्नाने नित्यवस्तूची प्राप्ती झाल्याने त्याला मृत्यूनंतर स्वानंदलोकात रहायला मिळेल. ही गणेशगीता जो भाविकांना समजावून सांगेल त्यालाही मोक्ष मिळेल,
ह्या अर्थाचा य इमं श्रावयेद्योगं कृत्वा स्वार्थं सुबुद्धिमान् ।
यथा योगी तथा सोऽपि परं निर्वाणमृच्छति ।। 40 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार गणेशगीता समजून घेऊन, त्यातील योगाचे स्वत: आचरण करून हा योग दुसऱ्यांना ऐकवेल तो योग्याप्रमाणे परम मोक्ष पावेल. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हा सर्वोत्तम योग साधण्यासाठी बाप्पांनी गणेशगीता सांगितली आहे. त्यानुसार आचरण करत गेल्यास आपल्या शरीरातील सुप्त ऊर्जा जागृत होते. आपली जी ऊर्जा जागृत असते ती दैनंदिन कार्यात खर्च होते पण गणेशगीतेच्या उपदेशानुसार आचरण करत गेल्यास सुप्त असलेली शारीरिक व मानसिक ऊर्जा जागृत होते. आपल्या मनाच्या घडणीला आपल्यावर असलेला षड्रिपुंचा प्रभाव कारणीभूत असतो.
गणेशगीतेच्या अभ्यासाने षड्रिपुंमुळे मनाला जडलेले काम, क्रोध आदि विकार गळून पडतात. म्हणून गणेशगीतेच्या उपदेशानुसार वागत गेल्यास मन निर्विकार होते. निर्विकारी मन आत्म्यावर असलेले देहबुद्धीचे पांघरूण अलगद काढून टाकते आणि आत्म्याला देहाच्या कैदेतून मुक्त करते. मुक्त झालेला आत्मा ईश्वराशी संयोग पावतो. ही सर्व क्रिया करणे फक्त मनुष्य जन्मातच शक्य असल्याने नरदेह लाभणे हे परमभाग्याचे लक्षण आहे असे मानले जाते आणि वरील फलश्रुती लक्षात घेतली तर ते परमभाग्य कोणतं हे सहजी लक्षात येतं. ज्याच्या हे लक्षात आलंय तो स्वत: त्यानुसार आचरण करत असताना इतरांनाही त्या मार्गावर आणून सोडण्यासाठी गणेशगीतेच्या उपदेशाचे श्रवण करवतो. जे उत्तम आणि महान असल्याची खात्री पटली आहे ते इतरांनाही सांगण्याचे लोककल्याणकारी कार्य करणाऱ्याचाही निश्चित उद्धार होतो.
निरपेक्षतेने हे कार्य करून मी सद्गुरूंची सेवाच करत आहे या भावनेने गणेशभक्तांना अत्यंत जिव्हाळ्याने तो गणेशगीता इतरांना समजावून देत असतो त्यालाही मोक्षप्राप्ती होते.
गणेशगीतेच्या वारंवार पठाणाने मुक्ती मिळते असं पुढील दोन श्लोकात सांगितलं आहे.
यो गीतां सम्यगभ्यस्य ज्ञात्वा चार्थं गुरोर्मुखात् ।
कृत्वा पूजां गणेशस्य प्रत्यहं पठते तु यऽ ।। 41।।
एककालं द्विकालं वा त्रिकालं वापि यऽ पठेत् ।
ब्रह्मीभूतस्य तस्यापि दर्शनान्मुच्यते नरऽ ।। 42 ।।
अर्थ- जो या गीतेचा चांगला अभ्यास करून आणि गुरूच्या मुखाने अर्थ जाणून प्रत्यही गणेशाची पूजा केल्यावर एककाल, द्विकाल अथवा त्रिकाल पठण करेल तो ब्रह्मरूप झालेला आहे असे समजावे. त्याच्या दर्शनाने देखील मनुष्याला मुक्ति मिळेल.
विवरण- जो गणेशगीता सद्गुरूंच्या मुखातून समजून घेईल व नंतर त्याचे नित्यपठण करेल तो ब्रह्मरूप होईल असं श्लोकात म्हंटलय. सद्गुरूंकडून ग्रंथ समजावून घ्यायची संधी मिळणारा परम भाग्यवान म्हणायला हवा कारण बाप्पांच्या सांगण्यातला अचूक अर्थ सद्गुरुच बरोब्बर सांगू शकतात पण सर्वांना हे भाग्य लाभतंच असं नाही. तेव्हा ग्रंथ हेच गुरु हे बोधवाक्य लक्षात ठेवून, ग्रंथांच्या अभ्यासातून का होईना गणेशगीता समजावून घ्यावी. अत्यंत श्रद्धेनं तिचं दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा पठण करावं.
क्रमश:








