वृत्तसंस्था/ पॅरीस
येत्या सोमवारपासून येथील रोलाँ गॅरो रेड क्लेकोर्टवर सुरू होणाऱया फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ गुरूवारी काढण्यात आला. या ड्रॉ नुसार पुरूष एकेरीमध्ये सर्बियाचा टॉप सीडेड जोकोविच, स्पेनचा नदाल आणि स्पेनचा नवोदित कार्लोस अलकॅरेझ यांचा स्पर्धेच्या एकाच विभागात समावेश झाला आहे.
या स्पर्धेत जोकोविचला अव्वल सिडींग देण्यात आले असून नदालला पाचवे सिडिंग मिळाले आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी जोकोविच आणि नदाल यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. स्पेनचा 19 वर्षीय अलकॅरेझ या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. नदालने आतापर्यंत 21 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा विक्रम केला आहे. जोकोविचने आतापर्यंत 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्याने यापूर्वी दोनवेळा प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. नदाल आणि जोकोविच यांना जेतेपदासाठी अलकॅरेझ तसेच सित्सिपस यांच्याशी कडवी लढत द्यावी लागेल.









