डिफेन्स ऑर्गनायझेशनची पथकाने घेतली भेट : नागपूरात प्रकल्प स्थापन होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लढाऊ विमान ’राफेल’ तयार करणारी फ्रेंच कंपनी दसॉ एव्हिएशन भारतात निर्मिती प्रकल्प सुरू करू पाहत आहे. भारतीय वायुदलाला 36 विमानांचा पुरवठा केल्यावर कंपनी भारतीय नौदलाला 26 ‘राफेल एम’ लढाऊ विमाने पुरविणार आहे. याच कराराकरता फ्रेंच कंपनीचे सीईओ एरिक ट्रेपियर हे स्वत:च्या काही सहकाऱ्यांसह भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संरक्षण प्रतिष्ठानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
नागपूरनजीक मिहानमध्ये सुरू असलेल्या जॉइंट व्हेंचर फॅसिलिटीला राफेलच्या असेंबली लाइनमध्ये रुपांतरित करण्याच्या शक्यतांवर फ्रेंच अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. दसॉला काही वर्षांमध्ये जगभरात 200 हून अधिक राफेल लढाऊ विमानांचा पुरवठा करायचा आहे, परंतु फ्रान्समध्ये कंपनीच्या असेंबली लाइनमध्ये वर्षात केवळ 24 विमानांचीच निर्मिती होऊ शकते. याचमुळे कराराची पूर्तता करण्यासाठी कंपनीला आणखी एका असेंबली लाइनची गरज आहे.
भारतात नवी असेंबली लाइन स्थापन करण्याच्या शक्यता शोधण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारत सरकारसोबत चर्चा केली आहे. भारतात नवी असेंबली लाइन स्थापन करण्यात आल्यास कंपनी वर्षाकाठी 48 विमानांचा पुरवठा करू शकणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो. कारण फ्रान्समधील असेंबली लाइनमध्ये सध्या 12,700 कर्मचारी कार्यरत आहेत.
भारत सरकारने 114 बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या खरेदीला प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दसॉची नजर याच व्यवहारावर आहे. या व्यवहाराचे मूल्य सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकते. परंतु सरकारने ही विमाने कुठल्या कंपनीकडून खरेदी करावीत याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.









