प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी परिसरात मालवाहू रेल्वे वरचेवर थांबविल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी तब्बल अर्धातास मालवाहू रेल्वे थांबविण्यात आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, तसेच काँग्रेस रोडवर प्रचंड गर्दी झाली होती. नागरिकांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी तब्बल पाऊण तास विलंब झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
शनिवारी दुपारी 3.45 च्या सुमारास एक मालवाहू रेल्वे टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट परिसरात आली. त्यापूर्वीच पाच मिनिटे रेल्वेगेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर काहीवेळाने कोल्हापूरहून तिरुपतीच्या दिशेने जाणारी हरिप्रिया एक्स्पे्रस या परिसरातून निघून गेली. रेल्वेगेट उघडण्याची प्रतीक्षा नागरिकांकडून सुरू होती. परंतु रेल्वेगेट काही केल्यास उघडले नाही.
अर्धा तासानंतर सायं. 4.15 वाजता रेल्वेगेट उघडण्यात आले. परंतु यादरम्यान वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अनगोळ कॉर्नरपर्यंत वाहनांची रांग येऊन पोहोचली होती. दिवसातून किमान एकवेळ तरी ही समस्या या परिसरातील नागरिकांना सतावत आहे. सध्या अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट बंद असल्यामुळे वाहतूक दुसऱ्या व तिसऱ्या रेल्वेगेट मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी टिळकवाडी परिसरात मालवाहू रेल्वेचे पार्किंग करू नये, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.









