कार्लसन जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर, प्रज्ञानंदसह अर्जुन एरिगेसीही उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/लास वेगास
साडेसात लाख अमेरिकन डॉलर्सची इनामे असलेल्या फ्रीस्टाईल ग्रँड स्लॅम टूरमध्ये अर्जुन एरिगेसीसह ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून प्रज्ञानंदने यादरम्यान जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. प्रज्ञानंदने बुधवारी भारतीय खेळाडूंनी कार्लसनला मागे टाकण्याचा अलीकडील ट्रेंड सुरू ठेवला आणि नॉर्वेजियन खेळाडूच्या मोहिमेला धक्का दिला. अलीकडच्या आठवड्यांत कार्लसनला जागतिक विजेता डी. गुकेशनेही पराभूत केले होते. गुकेश या स्पर्धेत उतरलेला नाही. 19 वर्षीय प्रज्ञानंदने सुऊवातीपासूनच प्रभावीपणे आपले कौशल्य वापरले आणि कार्लसनला काही संधी मिळाल्या असल्या, तरी प्रज्ञानंदने काही कल्पनारम्य युक्त्यांसह विजय मिळवला. प्रज्ञानंदविऊद्धच्या पराभवाचा कार्लसनवर इतका मोठा परिणाम झाला की, पुढच्या फेरीत त्याने वेस्ली सोविऊद्ध आणखी एक गेम गमावला आणि त्यानंतर चौथ्या स्थानासाठीच्या शेवटच्या टायब्रेकरमध्ये अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियननेही त्याला 2-0 असे नमविले. त्यामुळे कार्लसन धक्कादायकरीत्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला.
16 खेळाडू या स्पर्धेत आठ-आठ अशा प्रकारे दोन गटांमध्ये विभागले गेले होते आणि प्रत्येक गटातील खेळाडू एकमेकांसोबत एकदा खेळल्यानंतर आघाडीचे चार खेळाडू क्वार्टरफायनलमध्ये पोहोचले आहेत. स्पर्धेचे नियम अशा प्रकारे तयार केले गेले आहेत की, पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात आघाडीच्या स्थानांत न येणारे खेळाडू यापुढे स्पर्धा जिंकू शकत नाहीत आणि कार्लसन उर्वरित सामने जिंकल्यास तो तिसरे स्थान मिळवू शकतो. दुसऱ्या गटातील एरिगेसी हा दुसरा भारतीय असा खेळाडू राहिला ज्याने क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. सुऊवातीच्या काही संघर्षांना तोंड दिलेल्या एरिगेसीची कामगिरी चांगली राहिली. प्रज्ञानंद त्याच्या गटात संभाव्य सातपैकी 4.5 गुण मिळवून उझबेकिस्तानच्या नोदिरेक अब्दुसत्तोरोव्हसमवेत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे आणि जावोखिर संदारोव्ह व अॅरोनियन यांचे समान 4 गुण झाले आहेत. कार्लसन पाचव्या स्थानावर असून जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर, वेस्ली सो आणि कझाकस्तानची एकमेव महिला सहभागी बिबिसारा असाउबायेवा यांच्यापेक्षा पुढे आहे.
दुसऱ्या गटात हिकारू नाकामुराने आश्चर्यकारकरीत्या 7 पैकी 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि अमेरिकेचा आणखी एक खेळाडू हान्स निमन 4.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. एरिगेसी आणखी एक स्थानिक स्टार फॅबियानो काऊआनासह तिसऱ्या स्थानावर राहिला. दोघांचेही समान चार गुण झाले आहेत. लेनियर दुमिंग्वेझ पेरेझ, सेव्हियन सॅम्युअल आणि रॉबसन रे या अमेरिकन त्रिकुटाने दुसऱ्या गटात पाचवे ते सातवे स्थान प्राप्त केले आणि भारतीय विदित गुजराती शेवटच्या स्थानावर राहिला. आता क्वार्टरफायनलमध्ये प्रज्ञानंदचा सामना अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाशी होईल, तर एरिगेसीला अब्दुसत्तोरोव्हचा सामना करावा लागेल.









