वृत्तसंस्था/ हॅम्बर्ग, जर्मनी
विश्वविजेता डी. गुकेशला फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅममध्ये सातव्या स्थानासाठीच्या प्लेऑफ सामन्यात इराणी-फ्रेंच ग्रँडमास्टर अलिरेझा फिरोजा याच्याकडून पराभूत व्हावे लागल्याने त्याला शेवटच्या स्थानावर राहावे लागले आहे.
पहिल्या दिवशी अनिर्णित राहिलेल्या लढतीनंतर गुकेशला पुनरागमन करण्याची संधी होती, परंतु तो फक्त 30 चालींमध्ये पराभूत झाला. सामन्याच्या मध्यभागी झालेल्या चुकीमुळे त्याला हार मानावी लागली. फिरोजाने याचा फायदा उठवला आणि त्यामुळे त्याला विजय मिळवता आला. यामुळे वेसेनहॉसमधील ही स्पर्धा गुकेशसाठी एकही विजय न नोंदवता संपली आहे.
दरम्यान, विन्सेंट कीमर फॅबियानो काऊआनाला हरवून आश्चर्यकारकरीत्या विजेता ठरला आहे. अनेक उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांवर या जर्मन खेळाडूने मिळविलेले विजय हे स्पर्धेच्या प्रायोजकांच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम म्हणून पाहिले गेले आहेत. मॅग्नस कार्लसनने उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हला हरवून तिसरे स्थान मिळवले, तर हिकारू नाकामुरा उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविऊद्ध विजय मिळवून पाचव्या स्थानावर राहिला.









