वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग, जर्मनी
फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅमच्या नेहमीच्या वैशिष्ट्यापूर्ण स्वरुपात येथे विश्वविजेता डी गुकेश दोन सामन्यांच्या क्वॉर्टरफायनलमध्ये अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाशी लढेल. 10 सहभागी खेळाडूंमध्ये आठवे स्थान मिळविलेल्या गुकेशने स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्ह आणि अमेरिकेच्या लेव्हॉन आरोनियन यांना मागे टाकत बाहेर पडण्यापासून किंचित फरकाने वाचत बाद टप्प्यात प्रवेश केला. रॅपिड बुद्धिबळ नियमांनुसार खेळविल्या गेलेल्या साखळी टप्प्यात फेडोसेव्ह व आरोनियन हे शेवटचे दोन खेळाडू राहिले.
फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाने उझबेकिस्तानचा जावोखिर सिंदारोव्हला हरवून अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेच्या नियमांनुसार, पहिल्या तीन खेळाडूंना क्वॉर्टरफायनलमधील त्यांचे प्रतिस्पर्धी ठरविण्याचा अधिकार असतो आणि फिरोजाने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरला त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून निवडले. सिंदारोव्हने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराची निवड करून सर्वांना आश्चर्यचकित केले, तर काऊआनाने गुकेशची निवड केली. यामुळे नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह यांच्यात लढत रंगेल.
बाद फेरी ही वेगळ्या पद्धतीची राहील आणि ती क्लासिकल बुद्धिबळ नियमांनुसार खेळविली जाईल. यामध्ये फेरी सुरू होण्यापूर्वी सोंगाट्यांची स्थिती बदलली जाते आणि सुऊवातीच्या खेळाच्या माहितीऐवजी खऱ्या बुद्धिबळ कौशल्याची कसोटी लागते. सोंगट्या मांडण्याचे 960 वेगवेगळे मार्ग आहेत, म्हणूनच आतापर्यंत ही आवृत्ती ‘बुद्धिबळ 960’ म्हणून प्रसिद्ध राहिलेली आहे.
प्रत्येक बाद फेरीत दोन गेम असतील आणि निकाल बरोबरीत आल्यास विजेता निश्चित करण्यासाठी कमी कालावधीचे सामने खेळले जातील. स्पर्धेत 7 लाख 50 हजार डॉलर्सची बक्षिसे ठेवण्यात आली असून त्यापैकी 2 लाख डॉलर्स विजेत्यासाठी राखीव आहेत. या वर्षी आतापर्यंत पाच स्पर्धा जाहीर झाल्या आहेत आणि ‘टॉप-थ्री’ खेळाडूंना 1 लाख 50 हजार, 1 लाख आणि 50 हजार डॉलर्सचा अतिरिक्त बोनस मिळेल.
नवीन प्रवर्तकांद्वारे आयोजित फ्रीस्टाईल बुद्धिबळाची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होऊ शकते असा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर या स्पर्धेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाशी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. बराच विचारविनिमय केल्यानंतर पुढील 10 महिने हा विचार लांबणीवर टाकण्यात आला आणि ‘फिडे’ने ही स्पर्धा ग्रँडस्लॅम म्हणून आयोजित करण्यास मान्यता दिली.









