कारुआनाकडून पराभूत अर्जुन सहाव्या, तर प्रज्ञानंद सातव्या स्थानावर
वृत्तसंस्था/ लास वेगास
अमेरिकेच्या या शहरात आयोजिण्यात आलेल्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅममध्ये अमेरिकेचा ग्रँडमास्टर लेव्हॉन आरोनियन सर्वोच्च स्थानावर राहिला, तर भारतीय स्टार अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर राहिले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपल्याच देशाचा हान्स मोके निमनला 1.5-0.5 ने पराभूत करण्यापूर्वी आरोनियनने काही चिंताग्रस्त क्षणांचा सामना केला. जगातील अव्वल क्रमांकधारक नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनलाही असाच अनुभव आला. त्याने निराशाजनक पहिल्या गेमनंतर तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफमध्ये अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला हरवले. अर्जुनला अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाकडून 0-2 ने पराभव पत्करावा लागला, तर प्रज्ञानंदने अमेरिकेच्या वेस्ली सोला 1.5-0.5 ने पराभूत करून सातवे स्थान मिळविले.
स्पर्धा जिंकल्याबद्दल आरोनियनला 2 लाख अमेरिकन डॉलर्स मिळाले, तर अर्जुनला त्याच्या प्रयत्नांसाठी 40 हजार अमेरिकन डॉलर्स मिळाले. शेवटच्या फेरीतील विजयानंतर प्रज्ञानंदनेही एकूण 30 हजार अमेरिकन डॉलर्स जिंकून आपणही फारसे मागे राहणार नाही याची काळजी घेतली. प्रज्ञानंदने पहिल्या गेममध्ये काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळताना लढत बरोबरीत सोडविला, तर दुसऱ्या गेममध्ये मुसंडी मारत विजय आपल्या नावावर जमा केला. या दिवशी त्याची बहीण आर. वैशाली जॉर्जियातील बटुमी येथे चालू असलेल्या फिडे महिला विश्वचषकातून बाहेर पडली.
सुऊवातीच्या टप्प्यात चांगली कामगिरी करून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या अर्जुनने काऊआनाविऊद्धचे दोन्ही सामने गमावले. परंतु गट टप्प्याच्या अखेरीस आपण अंतिम चार खेळाडूंमध्ये राहू शकलो याचा त्याला आनंद असेल. अर्जुन आणि प्रज्ञानंदसाठी येणारा कालावधी व्यस्त राहणार आहे. कारण दोघेही आता काही दिवसांनी सुरू होणाऱ्या ई-स्पोर्ट्स विश्वचषक स्पर्धेसाठी रियाध, सौदी अरेबियाला जाणार आहेत. त्यानंतर अर्जुन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेत खेळताना दिसेल, तर प्रज्ञानंद सेंट लुईस येथे होणाऱ्या ग्रँड चेस टूरच्या सलग दोन स्पर्धांसाठी अमेरिकेला परत जाईल.









